आरंभ मराठी / धाराशिव
मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निर्माण झालेला पालकमंत्रीपदाचा अनेक दिवसांचा पेच अखेर शनिवारी सुटला असून,राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे.
त्यात धाराशिवच्या पालकमंत्रीपदी ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघाचे प्रताप सरनाईक यांची वर्णी लागली आहे तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिवचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना दिले जाईल अशी चर्चा सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना पालकमंत्री पद नाकारले असून,बीडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यानेही मुंडे भाऊ – बहिणीला धाराशिवचे पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री असतील, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंत्रीपदाचा शपथविधी होऊन दीड महिना लोटला तरी पालकमंत्री पदाची नावे जाहीर होत नव्हती. बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरण विषय लावून धरला असून, सर्वच समाजासोबत धस यांच्याकडून होणारी मागणी विचारात घेऊन मुंडे बहिण – भावाला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी या संदर्भातील नावे जाहीर झाली असून त्यात विशेषतः धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले आहे बीडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले असून, धाराशिवचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
धाराशिवला बाहेरच्या पालकमंत्र्यांची परंपरा कायम
धाराशिव जिल्हा विकासापासून जसा दूर आहे तसा मंत्रीपदापासूनही अनेक वर्षांपासून दूर आहे. 2019 ते 2014 या दरम्यान काँग्रेस आघाडीच्या काळात काही वर्ष पालकमंत्रीपदाची माळ तुळजापूरचे तत्कालीन आमदार तथा मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर महविकास आघाडीच्या काळात शंकरराव गडाख पालकमंत्री झाले. डॉ. तानाजी सावंत यांना काही काळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. मात्र,डॉ.सावंत हे जिल्ह्यात स्थायिक नसल्याने त्यांच्या पालकमंत्री पदाचा जिल्ह्याला फारसा उपयोग झाला नाही. आता पुन्हा एकदा जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री मिळाले आहेत यापूर्वीही अनेक वर्ष जिल्ह्याला बाहेरचे पालकमंत्री मिळाले असून, त्यामुळे जिल्ह्याचा विकासरथ रुतलेला आहे.