गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात ; यावर्षी केवळ ७५ दिवसांचाच गाळप हंगाम
ऊसासाठी कारखान्यांना करावी लागत आहे कसरत
सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी
साखर कारखान्याचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यावर्षी विधानसभा निवडणुकीमुळे साखर हंगाम तीन आठवडे उशिरा सुरू झाला.
मागील वर्षी जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे यावर्षी ऊसाचे क्षेत्र निम्म्याने कमी झालेले दिसून आले. त्यातच मागील तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यात गुळपिठी कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे याचा परिणाम साखर कारखान्यांवर झाला.
यावर्षी ऊसाचे कमी प्रमाण आणि ऊस मिळवण्यासाठी सुरू असलेली तीव्र स्पर्धा यामुळे साखर कारखान्यासाठी हा हंगाम आव्हानात्मक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच कारखान्यांना समस्यांचा सामना करतच गाळप हंगाम सुरू ठेवावा लागत आहे.
गाळप हंगामाचे दोन महिने पूर्ण होत असताना यावर्षी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एकूण १७ लाख टन गाळप पूर्ण केले आहे. यावर्षी सर्वात कमी म्हणजे केवळ ७५ दिवसच गाळप हंगाम असणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी तत्त्वावर चालणारे साखर कारखाने व ७ खाजगी मालकीच्या साखर कारखान्यामध्ये १२ जानेवारी २०२५ अखेर एकूण १७ लाख २७ हजार ६९६ मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
त्यामधून ११ लाख १३ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. पुढचे फार फार तर तीन आठवडे पुरेल एवढाच ऊस शिल्लक असल्याचे समजते.त्यामुळे यावर्षीचा गाळप हंगाम शंभर दिवस देखील पूर्ण करणार नाही.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात सुरू झाले होते. यावर्षी कारखान्यांनी अपेक्षित गाळप केले नसले तरी सर्वच कारखाने आजही सुरू आहेत. यामध्ये भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या आणि जिल्ह्यातील सर्वात जुन्या असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ९४६२० टन ऊस गाळप करून, ६५१०० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम या कारखान्याने १,३००३५ टन ऊस गाळप करून साखर १,२९,२०० क्विंटल साखर उत्पादन केले. केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने १,५६,०६२ टन ऊस गाळप केला. यातून १,३०,४०० क्विंटल साखर उत्पादीत झाली आहे. भैरवनाथ शुगर वर्क्सने भाडेतत्त्वावर घेतलेल्या शिवशक्ती सहकारी साखर कारखाना वाशी याने ६४,८४५ टन ऊस गाळप करून ५६४०० क्विंटल साखर उत्पादित केली.
लोहारा तालुक्यातील समुद्राळ येथील क्विनर्जी इंडस्ट्रीज भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याने ३,०४४६० टन ऊस गाळप करून ८६४५० क्विंटल साखर काढली. या साखर कारखान्याचा साखर उतारा जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
आयर्न मल्टीस्टेट एलएलपी बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा जवळा तालुका परंडा या कारखान्याने २,०९३३४ टन ऊस गाळप केले आहे.
जिल्ह्यातील पाच प्रमुख सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप कमी गाळप केले आहे. ऊस न मिळणे हे याचे प्रमुख कारण आहे.
नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रीज रांजणी या खाजगी कारखान्याने ३,०३,२३० ऊस गाळपातून २,६६,९५० क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. वाशी तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिल यांने ४२८६० टन ऊस गाळप केला त्यामधून ३५२३० क्विंटल साखर तयार झाली.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने ७१,१४० टन ऊस गाळून त्यातून ५४,८०० क्विंटल साखर उत्पादीत केली. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर शुगरने १,०२९२० टन ऊसातून ५६,२५० क्विंटल साखर काढली.
लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याने ८६७५० टन ऊस गाळपासाठी आणून त्यामधून ५७,७२० क्विंटल साखर मिळविली.
जिल्ह्यातील सर्वात जास्त १०.८४ साखर उतारा असलेल्या तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील कंचेश्वर शुगरने १,६१,४४० टन ऊस गाळप करून त्यामधून १,७४,७५० क्विंटल साखर उत्पादन केले.
सहकारी कारखान्यांपेक्षा खाजगी कारखान्यांचे गाळप जास्त
एकंदरीत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ७ लाख ५० हजार २२ टन ऊस गाळप करून ४ लाख ६७ हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. तसेच खाजगी साखर कारखान्यांनी ९ लाख ७७ हजार ६७४ टन ऊस गाळप केला. त्यामधून या कारखान्यांनी ६ लाख ४५ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. एकंदरीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अंत्यंत प्रतीकुल परिस्थितीतही १७ लाख २७ हजार ६९६ टन ऊसाचे गाळप करून ११ लाख १३ हजार २५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
यावर्षी सर्व कारखान्यांचा भाव सारखाच
यावर्षी जिल्ह्यातील खाजगी आणि सहकारी अशा सर्वच कारखान्यांनी सारखाच भाव दिला आहे. ऊसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे यावर्षी ऊस पळवापळवीची स्पर्धा जोरदार होती. शेतकऱ्यांनी देखील ज्या कारखान्याला ऊसाची नोंद आहे त्याच कारखान्याला ऊस न देता, जो चांगला भाव देतो त्यांनाच ऊस देण्यास सहमती दर्शवली. यावर्षी जवळपास सर्वांनीच २७०० रुपये प्रति टन पहिला हप्ता दिला आहे.
अंतिम भाव एकाही कारखान्याने जाहीर केला नसल्यामुळे त्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. ऊस उत्पादनाची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी ३००० ते ३२०० अंतिम भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. ऊस बिलाच्या बाबतीत देखील यावर्षी कारखान्यांनी नियमांचे पालन केले असून पंधरा दिवसांच्या आतच बील द्यायचा प्रयत्न केला आहे.
साखर कारखान्यांसमोर गुळपिठी कारखान्याचे आव्हान
धाराशिव जिल्ह्यात मागील दोन वर्षात गूळ पावडर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एसपी, सिद्धिविनायक, रूपामता याबरोबरच इतर गुळपिठी कारखान्यांनी साखर कारखान्यासमोर स्पर्धा निर्माण केली आहे. ऊसाची कमतरता असल्यामुळे गुळपिठी कारखान्यांनी ऊसाचे दर अगोदरच जाहीर करून यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आकर्षित केले. त्यामुळे हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांनी गुळपिठी कारखान्यांना ऊस दिला.
कारखान्यांचा गाळप हंगाम केवळ ७५ दिवस
यावर्षी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम शंभर दिवस देखील होणार नाही. त्यामुळे या हंगामात साखर कारखान्यांना तोटा सहन करावा लागला आहे. शेकडो कर्मचाऱ्यांच्या पगारी, मेंटेनन्स यासाठी साखर कारखाना किमान चार महिने म्हणजे १२५ दिवस चालणे गरजेचे असते. यावर्षी मात्र फक्त ७५ दिवस कारखाने चालू शकतील.