आज काँग्रेसची बैठक,शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तलवार म्यान,
दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा पेटणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर असतानाच शिवसेना उबाठा गटाने पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निर्णयानंतर आजच शहर काँग्रेस कमिटीची बैठक पार पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बैठका, नियोजन आणि उमेदवार ठरवण्याच्या हालचालींमध्ये गुंतलेले आहेत.
रविवारी पार पडलेल्या बैठकीत शिवसेना उबाठा गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीत शिवसेना महाविकास आघाडीच्याच माध्यमातून मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या निर्णयाने दोलायमान अवस्था झालेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवा श्वास मिळाला आहे. मात्र, शिवसेना उबाठा गटाची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद लक्षात घेता नगराध्यक्षपदावर पहिला दावा सेनेचा असणार, हे निश्चित. आता जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी घटक पक्षांना किती जागा मिळतात, हे राजकीय गणित पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
भाजपचा पेच वाढतोय
शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपला आता नवी रणनीती आखावी लागणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी भाजप स्वबळावर लढेल, असे स्पष्ट केले होते. परंतु स्थानिक नेत्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि संताजी चालुक्य यांनी पुण्यात आजच शिवसेना नेते, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची पुण्यात भेट घेतली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४० कोटींच्या विकासकामावरून भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष सुरू असतानाच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीची तलवार म्यान, काँग्रेसची बैठक आज
राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा करत उमेदवारही जाहीर केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीबरोबरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची यासंदर्भात आज बैठक पार पडणार असून, त्यानंतर एकत्रित आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
तीन वर्ष उशिराने निवडणूक, रंगणार स्पर्धा
२०१७ नंतर २०२२ मध्ये निवडणुका अपेक्षित होत्या, पण तब्बल तीन वर्षांनी पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता नव्या जोमाने तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात प्रतिष्ठेची लढत ठरणार असली तरी भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा गट अशी थेट लढत होईल अशी एकंदर स्थिती आहे.









