आरंभ मराठी / धाराशिव
तेच ठिकाण, तोच नेता आणि पुन्हा तीच गर्दी. हे चित्र धाराशिवकरांना 19 फेब्रुवारी रोजी अनुभवता येणार आहे.मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांचा धाराशिव जिल्हा निश्चित झाला असून, या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज पाटील मावळ्यांना संबोधित करणार आहेत.तसेच त्यांच्या नेतृत्वात शहरातून मोठी दुचारी रॅली काढण्यात येणार आहे.
मराठा योध्दा म्हणून नावलौकिक मिळालेले मनोज जरांगे-पाटील यांची धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 5 आक्टोबर 2023 रोजी भव्य सभा घेण्यात आली होती. या सभेला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आता पुन्हा एकदा याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज पाटील यांची भव्य सभा होणार असून, त्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे.धाराशिवचा शिवजन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. सोहळ्यातील वेगळेपण, समाजप्रबोधन, शोभायात्रा, महानाट्य, दुचाकी रॅली, अशा वैविध्यपूर्ण उपक्रमातून शिवजन्मोत्वसाची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे.उल्लेखनीय मानल्या जाणाऱ्या या महोत्सवात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनीही यावर्षी सहभागी होण्याची तयारी दाखवली असून,ते 19 फेब्रुवारीच्या दुचाकी रॅलीसाठी येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज पाटील हे मावळ्यांना संबोधित करतील. त्यांच्यासाठी चौकात भव्य स्टेज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. मावळ्यांना संबोधित केल्यानंतर मनोज पाटील यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार असून, त्यासाठी सबंध जिल्हाभरातून तरूण बांधव सहभागी होण्याचा अंदाज आहे.