आरंभ मराठी / धाराशिव
रामलिंग अभयारण्यातील वाघ पकडण्यासाठी आलेली ताडोबाची टीम परतल्यानंतर आता पुण्याच्या रेस्क्यू टीमने वाघाला पकडण्यासाठी दिवस-रात्र मोहीम सुरू ठेवली आहे.
बिबट्या पकडण्यामध्ये एक्स्पर्ट असलेल्या या टीमकडे तांत्रिक कौशल्य असल्यामुळे वाघ लवकर हाती लागेल असा विश्वास वनविभागाला आहे. पुण्याच्या टीमकडे वाघाला पकडण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
ताडोबाच्या टीमने वाघाला पकडण्यासाठी दिवसा प्रयत्न केले होते. परंतु, पुण्याची टीम दिवसा आणि रात्रीही वाघ पकडण्याचे प्रयत्न करत आहे. राज्याचे पश्चिम विभाग प्रमुख अप्पर प्रधान वन संरक्षक क्लेमेंट बेन आणि पुणे विभागाचे मुख्य वन संरक्षक ए.आर. प्रवीण, वनसंरक्षक प्रेमाद लाकरा या तिघांनी मंगळवारी रामलिंग अभयारण्यात येऊन मोहिमेचा आढावा घेतला.
क्लेमेंट बेन यांनी यावेळी पुण्याच्या टीमला काही सूचना केल्या. विशेषतः वाघाचा संचार असणाऱ्या भागात विहीर आणि तलावांचे काम सुरू आहे त्याठिकाणी ब्लास्टिंग होत असल्याचे त्यांना दिसून आले.
या ब्लास्टिंगच्या मोठ्या आवाजामुळे वाघ घाबरून बिथरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या भागात सुरू असणारी ब्लास्टिंग तात्काळ बंद करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
वाघाचा संचार असलेल्या परिसरात कृषिपंपाना रात्री लाईट न देता दिवसा लाईट सोडण्यात यावी अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत.
वाघाने आतापर्यंत धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग चार वेळा ओलांडला असल्याचे दिसून आले. त्यामुळे या महामार्गावर वाहनांना वेगमर्यादा करावी असेही त्यांनी सांगितले.
गेल्या सव्वा महिन्यापासून बार्शी तालुका आणि धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यामध्ये मुक्काम ठोकलेल्या वाघाला पकडण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून ताडोबाची रॅपिड रेस्क्यू टीम विशेष कार्य करीत होती.
गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचालींवर या टीम कडून बारीक लक्ष ठेवले गेले होते. मात्र, मागील काही दिवसांमध्ये विदर्भात वाघाच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्यामुळे येडशी अभयारण्यामध्ये पाठवण्यात आलेली रॅपिड रेस्क्यू टीम परत ताडोबात गेली आहे. आता पुणे रेस्क्यू टीम वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वाघाने आतापर्यंत धाराशिव, वाशी, भूम आणि बार्शी या चार तालुक्यातील तीस पेक्षा अधिक जनावरांचा फडशा पाडला आहे. या वाघाने गाईंवर मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. बुधवारी रात्री भूम तालुक्यातील सुकटा येथे हा वाघ दिसून आल्याची चर्चा आहे.