चौकशी समितीने ३० जानेवारीपर्यंत मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडून अभिलेखे मागवले
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषदेतील बोगस बिले प्रकरणाची चौकशी चार सदस्यीय समितीने सुरू केली आहे. माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मागील आठवड्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर सचिव म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे यांची निवड करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि बांधकाम आणि उपविभागीय अभियंता हे या समितीत सदस्य आहेत. समितीने कुठलाही विलंब न करता या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. त्याप्रमाणे समितीने चौकशीचे काम सुरू केले असून, गुरुवारी (दि.२३) रोजी मुख्याधिकारी वसुधा फड यांना पत्र लिहून नगर पालिकेने केलेली कामे, निविदा, बिले, विवरणपत्र या सर्वांची अभिलेखे दिनांक ३० जानेवारीपर्यंत चौकशी समितीला सादर करावीत असे सांगितले आहे.
आमदार सुरेश धस यांनी विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड, यांनी धाराशिव नगरपरिषद अंतर्गत लेखासंहीता 2013 प्रकरण कामे अंतर्गत 138 प्रमाणे कार्यवाही करण्याकरिता कामाचा छाननी तक्ता तयार करुन करोडो रुपयांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता चुकीच्या कामाची बिले दिल्याचा आरोप केला होता. याच आरोपांची चौकशी सध्या चौकशी केली जात आहे.
२३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेने मुख्याधिकारी वसुधा फड यांना एक पत्र काढून काही प्रश्नांचा खुलासा मागितला. यामध्ये मुख्याधिकारी यांनी कामे मुदतीत पुर्ण केलेली आहेत याची खातरजमा केली होती का? या कामांना मुदतवाढ देण्यात आली होती का? दिली असल्यास त्यासाठी कंत्राटदाराचा अर्ज, इंजिनीअरचा अभिप्राय व प्रशासकीय ठराव याबाबतची पुर्तता केलेली होती का ? त्याच्या आवक जावक नोंदीसह सर्व कागदपत्रांची खातरजमा केली होती का ? कामाच्या पुर्णत्वाचा दाखला आहे का? आणि मागील देयके देत असताना प्रशासकीय ठराव घेतलेला होता का ? या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
चौकशी समितीचे सदस्य सचिव सचिन इगे यांच्या नावाने मुख्याधिकारी वसुधा फड यांना हे पत्र देण्यात आले असून याला त्या काय उत्तर देतात हे येणाऱ्या दिवसात समजणार आहे.
३० जानेवारीपर्यंत ही माहिती द्यावी लागणार
मुख्याधिकारी वसुधा फड यांचा कार्यकाल दर्शविणारी माहिती, कार्यकाळात अदा करण्यात आलेल्या देयकांची योजनानिहाय यादी, छाननी तक्ता, सर्व योजनांच्या रोखपुस्तिका (Cash Book), Bank Account Statement च्या योजनानिहाय साक्षांकित प्रती, वर्षनिहाय प्राप्त निधी, झालेला खर्च, मोजमाप पुस्तिका, प्रशासकीय मान्यता आदेश तांत्रिक मान्यता आदेश, निधी वितरण आदेश, कामाच्या संचिका व इतर अनुषंगिक अभिलेखे हा सर्व दस्तऐवज दिनांक ३० जानेवारीपर्यंत चौकशी समितीकडे जमा करावा असा आदेश देण्यात आला आहे.