आरंभ मराठी / धाराशिव
शुक्रवारी सायंकाळी जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा शनिवारी सकाळी सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य तिघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तलवार, चाकू आणि कोयत्याने झालेल्या या हल्ल्यामुळे तालुक्यातील बुकनवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुकनवाडी येथे शुक्रवारी एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. याचदरम्यान गावातील एका व्यक्तीची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर ही दुचाकी मिळून आली. मात्र, या घटनेनंतर एका गटाकडून मारहाणीचा आरोप करण्यात आला.
या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यानंतर जमावाने गावातील काही तरुणांवर तलवार, चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात चार तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका तरुणाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर बुकनवाडी गावात तणावाचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यात सहभागी व्यक्तींची माहिती तपासातून स्पष्ट होणार आहे.










