अप्पर पोलीस अधीक्षक काँवत यांच्यासह सहायक पोलीस अधीक्षक रमेश यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / कळंब
शहरात प्रमुख मार्गावरील एका बँकेचे एटीएम मशीन गायब करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलिसांच्या श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश आले. दरम्यान,अप्पर पोलीस अधीक्षक काँवत तसेच सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी एटीएम फोडलेल्या ठिकाणची पाहणी केली.
प्राथमिक माहितीनुसार कळंब शहरातील मुख्य मार्गावरील ढोकी रोडवर जंत्रे कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM असून, आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी ATM मशीन घेऊन पलायन केले. या ATM मशिनमध्ये तब्बल ४० लाख रुपयांची रक्कम असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी तत्काळ हजर झाले होते.या घटनेमुळे कळंब शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांसमोर हे आव्हान असून,तपासासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.