आरंभ मराठी / धाराशिव
डिसेंबर महिन्यात झालेल्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच एकहाती सत्ता मिळवत नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जनतेतून नगराध्यक्षपदी नेहा काकडे यांची निवड झाली, तर भाजपचे तब्बल २२ नगरसेवक निवडून आले. सत्ता स्थापन झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती.
तब्बल दहा ते बारा नगरसेवक या पदासाठी इच्छुक होते. मात्र, अनपेक्षितपणे पहिली संधी अक्षय ढोबळे यांना देण्यात आली होती. अक्षय ढोबळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी उपनगराध्यक्षपदासाठी सहा-सहा महिन्यांची मुदत निश्चित केली होती. त्यानुसार जून महिन्यात ढोबळे यांच्या पदाची सहा महिन्यांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देऊन पुढील इच्छुक नगरसेवकाला संधी देणे अपेक्षित होते.
मात्र, मुदत संपल्यानंतरही ढोबळे यांनी राजीनामा न दिल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली. सहा महिन्यांची मुदत पूर्ण होऊनही पदावर कायम राहिल्याने पालिकेतील सत्ताधारी गटातच वादावादीचे प्रकार घडले होते. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या हालचालीही वाढल्या होत्या. त्यामुळे ढोबळे यांच्या राजीनाम्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.
अखेर तीन महिन्यांच्या विलंबानंतर अक्षय ढोबळे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता धाराशिव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी पुढील नाव कोणाचे निश्चित होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. एका अनुभवी नगरसेवकाचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाले असून, इतर नगरसेवकांनी आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय उपनगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करू नये अशी विनंती केल्यामुळे अधिकृतपणे पक्षाने नाव जाहीर केलेले नाही. उद्या (दि.२६) आमदार राणा पाटील यांच्यासोबत भाजप नगरसेवकांची महत्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्यात येईल असे समजते.
भाजपकडे नगरपालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद पक्षांतर्गत निर्णयातून निश्चित होणार आहे. आधीपासूनच या पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये अमित शिंदे, अभिजित काकडे, आकाश तावडे यांची नावे चर्चेत आहेत. नवीन उपनगराध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहा महिन्यांच्या कालावधीची पक्षाची पूर्वनिश्चिती कायम राहणार की नव्या समीकरणानुसार निर्णय घेतला जाणार, याकडेही नगरसेवकांसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.










