आरंभ मराठी / धाराशिव
माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत आणि त्यांचे बंधू प्रा. शिवाजीराव सावंत यांचे अखेर मनोमिलन झाले आहे. माढा तालुक्यातील वाकाव येथील सावंत कुटुंबात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला राजकीय आणि पारिवारिक दुरावा अखेर संपुष्टात आला आहे. राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत या दोन्ही बंधूंचे मनोमिलन झाले असून, सावंत कुटुंब पुन्हा एकत्र आल्याची माहिती प्रा. शिवाजीराव सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांनी मंगळवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
त्यामुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या दीड वर्षापासून डॉ. तानाजीराव सावंत आणि प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यात राजकीय तसेच कौटुंबिक पातळीवर मतभेद निर्माण झाले होते. या दुराव्याचे पडसाद केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता पुणे आणि ठाणे जिल्ह्यापर्यंत पोहोचले होते. सावंत कुटुंबातील या राजकीय संघर्षाची राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा झाली होती. अखेर दोन्ही बंधूंमधील गैरसमज दूर झाले असून, त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीराज सावंत यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना कुटुंबाची नाळ आणि रक्ताची नाती कोणत्याही राजकीय वावटळीपेक्षा मोठी असल्याचे नमूद केले. सावंत कुटुंब पुन्हा एकाच चौकटीत एकत्र आले असून, भविष्यातही कुटुंब एकत्रच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मनोमिलनाचे सावंत समर्थकांकडून स्वागत करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांतील राजकीय मतभेदांमुळे सावंत कुटुंबाच्या राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, आता दोन्ही बंधू पुन्हा एकत्र आल्याने या चर्चांना लगाम बसला आहे. दरम्यान, सावंत कुटुंबातील दुसरे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय सावंत यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय सावंत यांनी काका डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विरोधात बंड पुकारत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. या राजकीय संघर्षानंतर काका-पुतण्यातील दुरावा अधिकच वाढला होता.
आता तानाजीराव आणि शिवाजीराव सावंत या दोन भावांमधील वाद मिटल्याने सावंत कुटुंबातील पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय सावंत यांचेही मन वळवून कुटुंबातील दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सावंत कुटुंबातील हे मनोमिलन केवळ दोन भावांपुरते मर्यादित राहणार की संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदिलाने एकत्र येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









