आरंभ मराठी / धाराशिव
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा गावातील पारधी पिढी येथे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून २२ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख २ लाख ४६ हजार ६०० रुपये, १५ मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि एका चारचाकी वाहनासह तब्बल १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली २५ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा गावातील पारधी पिढी येथे लाखो रुपयांचा तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ते ठिकाण पारधी वस्तीतील संवेदनशील परिसर असून, तेथील परिस्थिती लक्षात घेता कारवाई करणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. मात्र, पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईचे नियोजन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, जलद प्रतिसाद पथक तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या मदतीने सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. आखलेल्या योजनेनुसार पोलिसांनी तिरट जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.
मात्र, पथकाने परिसराला घेराव घालून पैशांची पैज लावून तिरट जुगार खेळणाऱ्या २२ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख २ लाख ४६ हजार ६०० रुपये, १५ मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य तसेच एका चारचाकी वाहनासह एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा तब्बल १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे तिरट जुगारावरील कारवाईसोबतच दोन वॉन्टेड आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, चापोअंमलदार महेबुब अरब, चापोशी केदार तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अंमलदारांचा कारवाईत सहभाग होता.










