आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, पिकांची वाढ खुंटल्याने आणि अनेक ठिकाणी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या जात असल्याचे वृत्त दैनिक आरंभ मराठीने प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी नोटिसा देणाऱ्या बँकांबाबत कठोर भूमिका घेत कारवाईचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या परतफेडीसाठी नोटिसा देणाऱ्या बँकेची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित बँक तसेच शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसांबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नोटिसा देणाऱ्या बँकेबाबत कारवाईची भूमिका मांडत, संबंधित बँकेला इशारा दिला आहे. काही बँका आगाऊपणा करत असून त्यांना सरळ करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दैनिक आरंभ मराठीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून पीक कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांना वकिलामार्फत नोटिसा पाठविल्या जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. पांगरदरवाडी येथील रहिवासी व या शाखेचे कर्जदार गुंडीपंत नामा मारडकर यांना पीक कर्जाच्या परतफेडीसंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले होते. पावसाअभावी पिके संकटात असताना कर्जफेडीसाठी नोटीस मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च केला.
मात्र, पावसाने सुरुवातीपासूनच अनियमितता दाखवल्याने अनेक भागात पिकांना पुरेसा ओलावा मिळाला नाही. काही ठिकाणी पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला, तर काही भागात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. अनेक शेतांमध्ये पिकांची अवस्था अत्यंत दयनीय असून काही ठिकाणी पिके वाळून गेली आहेत. पीक हातात येण्याची शक्यता कमी असताना दुसरीकडे कर्जफेडीसाठी बँकेच्या नोटिसा येऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. शेतातील उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे.
खरीप हंगामासाठी केलेला खर्चही भरून निघण्याची शक्यता नसताना कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
‘शेतात पीक नाही, उत्पन्नाची खात्री नाही आणि हातात कर्जफेडीची नोटीस आहे’, अशी स्थिती अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकांनी सध्याची पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी होत होती.
आरंभ मराठीने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडत शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासन आणि शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. या वृत्ताची मुख्यमंत्र्यांनी थेट दखल घेत संबंधित बँकेची माहिती मागवून घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शासनस्तरावर गांभीर्याने घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात शासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











