आरंभ मराठी / धाराशिव
आज सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांच्या सुमारास धाराशिव शहरासह परिसरात अचानक मोठा गूढ आवाज झाल्याने नागरिकांमध्ये काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूगर्भातून आलेल्या या आवाजानंतर सुमारे चार ते पाच सेकंद धरणीकंप झाल्यासारखा कंपनयुक्त आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळच्या वेळेत अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने शहरातील अनेक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. काही नागरिक घराबाहेर पडले. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अधूनमधून अशा प्रकारचे गूढ आवाज ऐकू येत आहेत. विशेष म्हणजे मोठा आवाज झाल्यानंतर काही वेळ धरणीकंपासारखा अनुभव नागरिकांना येतो. मात्र, त्यानंतर भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची अधिकृत नोंद होत नसल्याने या घटनांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे. भूगर्भातील हालचाली, खडकांमध्ये निर्माण होणारा ताण किंवा अन्य भूगर्भीय प्रक्रियांमुळे अशा प्रकारचे आवाज निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी हा आवाज म्हणजे भूकंपच आहे, असे समजण्याचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी शुक्रवारी (दि.२१) सकाळी साडेअकराच्या सुमारासही धाराशिव शहर व परिसरात अशाच प्रकारचा गूढ आवाज ऐकू आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी सकाळी आवाज झाल्याने नागरिकांमध्ये या घटनांबाबत कुतूहल आणि चिंता वाढली आहे.










