आरंभ मराठी / धाराशिव
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांची संमती नसतानाही बनावट स्वाक्षऱ्या, अंगठे आणि छायाचित्रांचा वापर करून खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेरेंटिका रिन्यूएबल इंडिया कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत हा प्रकार झाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे.यातील दोन शेतकरी सैन्य दलात कार्यरत असून, ते भूतान देशात आणि अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर असताना त्यांच्या बोगस सह्यांचा वापर करण्यात आला आहे.
मलकापूर येथील गट क्रमांक २३६ आणि २३७ या सामायिक मालकीच्या शेतजमिनीबाबत १५ मे २०२४ रोजी कळंब येथील कार्यालयात खरेदीखत नोंदविण्यात आले. या जमिनीचे १९ सामायिक मालक असताना त्यापैकी १० जणांची संमती नसल्याचा दावा तक्रारदार शेतकऱ्यांनी केला आहे. या दहा जणांपैकी पाच शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, अच्युतराव उद्धवराव लोमटे हे खरेदीखताच्या दिवशी बार्शी येथील रुग्णालयात उपचार घेत होते. श्रीकांत पोपटराव लोमटे हे सैन्य दलात असून त्या दिवशी भूतान येथे कर्तव्यावर होते. त्यांचे बंधू राजाभाऊ लोमटे हे अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर होते. विजयमाला पोपट लोमटे आणि शशिकांत लोमटे हे देखील खरेदीखतासाठी कळंब येथील कार्यालयात गेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही त्यांच्या स्वाक्षऱ्या, अंगठे आणि छायाचित्रांचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विशेष म्हणजे श्रीकांत पोपटराव लोमटे हे खरेदीखताच्या दिवशी भूतान येथे कर्तव्यावर होते, तर त्यांचे बंधू राजाभाऊ लोमटे हे अरुणाचल प्रदेशात ड्युटीवर होते. दोघांनीही आपण त्या दिवशी कळंब येथे उपस्थित नसल्याचे दर्शविणारे कर्तव्यावरील पुरावे प्रशासनाकडे सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे आता २५ ऑगस्टच्या सुनावणीत कंपनीकडून काय भूमिका मांडली जाते आणि प्रशासन याबाबत कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
_
दोन वर्षांनी फेरफारची नोटीस,
खरेदीखत झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी जून महिन्यात मलकापूरच्या चावडीवर फेरफार नोंदणीसंदर्भातील नोटीस लावण्यात आली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना जमिनीच्या व्यवहाराची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी प्रशासनाकडे धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात कार्यवाही करण्याच्या सूचना कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी सेरेंटिका रिन्यूएबल कंपनीचे प्रतिनिधी दीपक नथुराम शिंदे यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
_
सातबारावरील नोंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप,
संबंधित शेतकऱ्यांनी या खरेदीखतावरून फेरफार नोंद करू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मात्र सातबारावर कंपनीच्या प्रतिनिधीचा उल्लेख आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
_
निबंधक कार्यालयातील प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह,
बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत नोंदविण्यात आले असल्यास या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित सहनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कंपनीचे प्रतिनिधी आणि काही खासगी व्यक्तींनी संगनमत करून हा व्यवहार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनासोबतच दस्त नोंदणी विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.










