आरंभ मराठी / तुळजापूर
महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात भाविक, मान्यवर आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक नवीन जिल्हा विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. सुमारे १६ कोटी ३४ लाख २९ हजार रुपये खर्चाच्या या प्रस्तावित प्रकल्पाच्या कामाला गती देऊन तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.
यासंदर्भात मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री भोंसले यांच्या दालनात बुधवारी (दि.१९) आढावा बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर येथे प्रस्तावित विश्रामगृहाचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ३,३६६ चौ.मी. असून इमारत G+2 स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक मजल्यावर निवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा अंदाज तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य अभियंता कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून सध्या प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहे.
सोलर ऊर्जा, सेंट्रलाइज्ड एसीसह आधुनिक सुविधा –
प्रस्तावित विश्रामगृहाच्या बांधकामात गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. इमारतीमध्ये फर्निचरसह आवश्यक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सोलर पॅनलची सुविधा आणि संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज्ड वातानुकूलित प्रणाली बसविण्याच्या सूचनाही मंत्री भोंसले यांनी दिल्या. ऊर्जाबचत, पर्यावरणपूरक बांधकाम आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय साधून प्रकल्पाचे नियोजन करावे. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुळजापूर हे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येणारे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. भाविक आणि पर्यटकांची वाढती संख्या तसेच शासकीय व प्रशासकीय गरजा लक्षात घेता नवीन जिल्हा विश्रामगृहामुळे शहरातील निवास सुविधेत मोठी भर पडणार आहे. आधुनिक सुविधांनी युक्त या प्रकल्पामुळे तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच शहराच्या पायाभूत सुविधांनाही बळकटी मिळणार आहे.









