आरंभ मराठी-
दिल्लीतील जंतर-मंतर हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील जनआंदोलनांचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या, व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणाऱ्या आणि परिवर्तनाची हाक देणाऱ्या असंख्य चळवळींनी या मैदानाला ऐतिहासिक ओळख मिळवून दिली आहे. याच मैदानावर २०११ मध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उभारलेले आंदोलन देशभरात अभूतपूर्व जनसमर्थन मिळवत राष्ट्रीय राजकारणाचा प्रवाह बदलणारे ठरले होते.
आता पुन्हा एकदा जंतर-मंतर महाराष्ट्रातील एका नव्या नेतृत्वामुळे चर्चेत आले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रणेते अभिजित दीपके यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या आंदोलनाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात युवकांचा मोठा सहभाग दिसून आल्याने नव्या राजकीय पर्यायाच्या शक्यतांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शनिवारी अभिजित दीपिके दिल्लीत दाखल होताच जंतर-मंतर परिसरात समर्थकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. देशाच्या विविध भागांतून आलेले कार्यकर्ते आणि युवकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. समाजमाध्यमांवरही या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उभ्या राहत असलेल्या नव्या राजकीय प्रवाहाला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी जनमत निर्माण केले होते. त्या आंदोलनातून अनेक नवे राजकीय आणि सामाजिक प्रवाह जन्माला आले. आजच्या परिस्थितीत अभिजित दीपके यांचे आंदोलन वेगळ्या पार्श्वभूमीवर उभे असले, तरी महाराष्ट्रातून उभे राहिलेले नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे.
राजकारणातील पारंपरिक समीकरणांबद्दल वाढत चाललेली नाराजी, युवकांमधील परिवर्तनाची अपेक्षा आणि डिजिटल माध्यमातून वेगाने निर्माण होणारे जनसमर्थन या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः तरुण मतदारांमध्ये या पक्षाबाबत उत्सुकता वाढत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
जंतर-मंतर हे ठिकाण जनभावनांचे प्रतिबिंब मानले जाते. या मैदानावरून उठणारा आवाज अनेकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाकडे केवळ एका पक्षाच्या कार्यक्रमाच्या नजरेतून पाहता येणार नाही. ते नव्या नेतृत्वाच्या उदयाची चाहूल आहे की क्षणिक राजकीय उत्साह, याचे उत्तर भविष्यात मिळेल.
मात्र एवढे निश्चित की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातून उभे राहिलेले एक नेतृत्व जंतर-मंतरच्या माध्यमातून राष्ट्रीय पटलावर चर्चेत आले आहे. आणि त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वातावरणात महाराष्ट्राच्या नावाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.










