आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा आज केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर समाधानकारक निर्णय न घेतल्याचा आरोप करत त्यांनी यावेळी सरकारचा नाही तर माझाच तुकडा पडेल, असा इशारा दिला आहे.
चार दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. आज अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या आगामी आंदोलनाची माहिती दिली.
यावेळी जरांगे पाटील यांनी मंडपात नव्हे तर थेट रखरखत्या उन्हात उपोषण करणार असल्याची भूमिका जाहीर केली. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार आहे. उपोषणादरम्यान माझा उष्माघाताने मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. उन्हात किती त्रास होईल याचा मी विचार करत नाही. पायात चप्पल नसेल, अन्न-पाणी नसेल, काय व्हायचं ते होऊ द्या.
सरकारने मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा केला आहे, असा आरोपही त्यांनी सरकारवर केला. मराठा समाजातील नागरिकांनी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये. मी एकटाच लढा देणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले.
५८ लाख नोंदी सापडल्या, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना वैधता देणार का? हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे प्रमाणपत्र देणार का? त्याची वैधता देणार का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
तसेच, सरकारला मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? आमच्या पाच पिढ्यांचा बॅकलॉग कोण भरून काढणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता आरपारची लढाई लढणार असल्याचे स्पष्ट करत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र मागील तीन महिन्यापासून जरांगे पाटील हे सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत आहेत. सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत असा आरोप त्यांच्याकडून होत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील मराठा आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.









