धर्मदर्शनासाठी चार ते पाच तासाचा वेळ
आरंभ मराठी / तुळजापूर
अधिकमासातील रविवार निमित्त तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून तुळजाभवानी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे . गर्दीमुळे भाविकांना धर्मदर्शनासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे
सध्या तीन वर्षातून येणारा अधिकमास सुरू असून उन्हाळी सुट्ट्या देखील सुरू आहेत त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी तुळजापुरात होत आहे.
रविवारी सकाळपासूनच भाविकांची गर्दी तुळजापूर मध्ये वाढताना दिसून आली असून मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दिसून येत आहेत दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांच्या गर्दीने फुल्ल झाले असून मंदिर संस्थांकडून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत .त्यामध्ये दर्शन मंडपात कुलरची तसेच थंड पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे .
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर संस्थांनकडून रेफरर पास बंद करण्यात आले असून पाचशे रुपयांचे व दोनशे रुपयांचे देणगी पास सध्या सुरू आहेत. हे पास घेण्यासाठी देखील भाविकांनी मोठी गर्दी केलेली दिसून येत असून दोनशे रुपयांची दर्शन पासची रांग ही अभिषेक मंडपापर्यंत गेलेली दिसून आली आहे .
सध्या उन्हाची तीव्रता जास्त असली तरी मंदिर संस्थांनकडून भाविकांसाठी भवानी रोड तसेच महाव्दार रोडवर सावलीची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
भाविकांच्या वाहनांनी तुळजापूर शहरात मोठी गर्दी केली असून शहरातील सर्वच पार्किंग फुल भरलेल्या दिसून येत आहेत अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.








