आरंभ मराठी / धाराशिव
आज मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. मागील काही दिवसांपासून या हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू होती. अखेर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या प्रक्रियेला अंतिम रूप मिळाले असून, महाविद्यालयाच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे महाविद्यालयात आधुनिक पायाभूत सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण अध्यापन व्यवस्था आणि नवीन शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध होणार आहे. शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर निधी उपलब्धता वाढणार असल्याने महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेषतः तुळजापूर आणि परिसरातील ग्रामीण व होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामुळे त्यांना कमी खर्चात दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळणार असून, तांत्रिक शिक्षण क्षेत्रात नवीन दालने खुली होणार आहेत.
स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनीही हा निर्णय सकारात्मक असल्याचे मत व्यक्त केले आहे. शासनाच्या या पुढाकारामुळे धाराशिव जिल्ह्यात तांत्रिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.









