आरंभ मराठी / धाराशिव
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या बसवराज पाटील यांच्या सत्कारानिमित्त रूपामाता परिवाराच्या वतीने रविवारी (दि.२) धाराशिव येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सत्कार समारंभात आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कारापेक्षा भाजपमधील अंतर्गत वाद, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांतील नाराजी आणि श्रेयवाद यांचीच सर्वाधिक चर्चा रंगली. विविध नेत्यांच्या भाषणातून पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त करण्यात आल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या सत्कार समारंभासाठी रूपामाता परिवाराचे व्यंकटराव गुंड यांनी भाजपमधील अनेक जुने आणि नवे नेते, तसेच महायुतीतील विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. मात्र आमदार राणा पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना निमंत्रण पत्रिकेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याने कार्यक्रमापूर्वीच राजकीय चर्चांना उधाण आले होते. कार्यक्रम पक्षाचा नसून रूपामाता परिवाराचा असल्याने कोणाला निमंत्रण द्यायचे आणि कोणाला नाही, हा अधिकार आयोजकांचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राणा पाटील आणि अर्चनाताई पाटील यांना मुद्दाम निमंत्रण न देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, बसवराज पाटील यांचा धाराशिव शहरातील हा पहिलाच सत्कार असतानाही भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. तसेच नितीन काळे यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद अधिकच स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुतीच्या व्यासपीठावर प्रथमच उपस्थित राहिले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास कोळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य कोंडाप्पा कोरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, शिवसेनेचे सुरज साळुंखे तसेच माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमातील भाषणांमध्ये अनेक नेत्यांनी आमदार राणा पाटील यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप हा पक्ष व्यक्तीकेंद्री किंवा कुटुंबकेंद्री नसल्याचे स्पष्ट केले. जुन्या आणि संघर्षातून पक्ष उभा करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. विकासकामांच्या श्रेयवादावर भाष्य करताना ठाकूर म्हणाले की, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचा मुद्दा आपण सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून या प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली. मात्र आज त्याचे श्रेय इतरच काही लोक घेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच धाराशिवसाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपचे जुने कार्यकर्ते गेली तीस वर्षे संघर्ष करत आहेत. लाठ्या-काठ्या खाल्ल्या, संकटांना सामोरे गेले, त्यानंतर सत्ता आली. आता सत्तेनंतर जुन्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. पक्षाचा मालक कोणीही होऊ नये, अशा शब्दांत ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील नेतृत्वावर निशाणा साधला. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही भाषणात अप्रत्यक्ष टीकेचा सूर कायम ठेवला. मी महायुतीत आलो आणि बसवराज पाटील आमदार झाले, हे अनेकांच्या पचनी पडलेले नाही, असे म्हणत त्यांनी आमदार राणा पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष शरसंधान साधले.
केंद्रीय विद्यालयाच्या मुद्द्यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, लोकसभेत वारंवार आवाज उठवून हा प्रश्न मार्गी लावला. मात्र पाहणीसाठी पथक आल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी वेगळेच काही नेते पुढे आले. भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते आता माझ्याकडे येऊन “तुम्ही महायुतीत आलात, ते चांगले झाले,” असे सांगत असल्याचाही दावा त्यांनी केला. रूपामाता परिवाराचे व्यंकटराव गुंड तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनीही आपल्या भाषणात जुन्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. पक्षात काही जणांकडून मनमानी सुरू असल्याचे सांगत त्यांनी नाराजी उघडपणे व्यक्त केली.
या कार्यक्रमात आणखी एक विशेष बाब म्हणजे भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित असतानाही एकही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य उपस्थित नसल्याचे दिसून आले. यामुळे भाजपमधील अंतर्गत दरी अधिकच स्पष्ट झाल्याची चर्चा रंगली.
कार्यक्रमादरम्यान व्यंकटराव गुंड, ॲड. अनिल काळे, सुजितसिंह ठाकूर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार बसवराज पाटील यांच्यात हसत-खेळत संवाद सुरू असल्याचेही उपस्थितांनी पाहिले. दरम्यान, मागील सोमवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या धाराशिव दौऱ्यात ॲड. अनिल काळे यांना मंत्र्यांची भेट घेऊ न दिल्याबद्दल त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले होते. त्यापाठोपाठ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनीही जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली होती. भाजपमधील वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांचे कान टोचत नाराजी योग्य पक्षीय व्यासपीठावर मांडावी, प्रसारमाध्यमांमधून किंवा जाहीर कार्यक्रमांतून व्यक्त करू नये, असे आवाहन केले होते. मात्र अवघ्या दोन दिवसांतच भाजपचे जुने कार्यकर्ते जाहीर कार्यक्रमात एकत्र येऊन उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता अधिक तीव्र होत असल्याचे संकेत या कार्यक्रमातून मिळाले. यावेळी व्यंकटराव गुंड आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींनंतर आमदार राणा पाटील यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आमदार राणा पाटील काय भूमिका मांडतात, याकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








