आरंभ मराठी / धाराशिव
माहेरहून पाच तोळे सोने आणण्याच्या मागणीसाठी सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केल्याने १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता शुभम कदम (वय १९, रा. शेकापुर ता. जि. धाराशिव) हिने दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील विवेकानंदनगर परिसरात राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी निता गणेश गरड (वय ४०, रा. विवेकानंदनगर, तुळजापूर) यांनी दिनांक २७ एप्रिल रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, नम्रता हिला पती शुभम मोहन कदम, सासू जयश्री मोहन कदम (दोघे रा. शेकापुर), तसेच अंजली अशोक यादव (रा. अमृतवाडी), दिपाली संतोष सुरवसे (रा. बार्शी) आणि सोनाली बालाजी मोहिते (रा. सांजा, ता. जि. धाराशिव) यांनी वारंवार त्रास दिला.
“येणाऱ्या धोंड्याच्या महिन्यात माहेरहून पाच तोळे सोने घेऊन ये, अन्यथा तुला घरात घेणार नाही, तसेच शुभमचे दुसरे लग्न लावून देऊ,” अशी धमकी देत आरोपींकडून नम्रतावर दबाव टाकण्यात येत होता.
यासोबतच तिच्यावर मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या छळाला कंटाळून नम्रता हिने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








