लोकअदालतीचे कामकाज सुरू असताना घडला प्रकार; महावितरणचे अभियंता हिंगमिरे गंभीर जखमी
महावितरण कर्मचारी, अधिकारी आंदोलनाच्या पावित्र्यात
प्रतिनिधी / वाशी
सोनेगाव, सारोळा (वाशी) येथील खंडित असलेला वीज पुरवठा लिंक लाईनचे काम तत्काळ पूर्ण करून सुरू करण्याच्या कारणावरून सहायक अभियंता हिंगमिरे यांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यांच्या डोक्यात खुर्ची मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.ही घटना शुक्रवारी (दि.8) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील महावितरण कार्यालयात घडली.
मारहाणीत अभियंता ज्योतिर्लिंग हिंगमिरे हे गंभीर जखमी झाले असून हिंगमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूकाध्यक्ष (अजित पवार गट) सूर्यकांत सांडसे , विनोद माने यांच्यासह भाजपा नगरसेवक भागवत कवडे यांच्याविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सारोळा (वाशी), सोनेगाव, कवडेवाडी येथे महावितरणकडून खंडित वीज पुरवठा सुरू आहे. यामुळे या भागातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. उपोषण स्थळी सूर्यकांत सांडसे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी सांडसे यांनी हिंगमिरे यांना फोन करून महावितरणच्या उपाययोजनेबाबत माहिती घेतली. यावेळी दोघात समाधानकारक चर्चा न झाल्याने सूर्यकांत सांडसे हे विनोद माने ,भागवत कवडे यांच्यासह महावितरण कार्यालयात गेले. यावेळी महावितरण कार्यालयात सहायक अभियंता जोतिर्लिंग हिंगमिरे लोक अदालतीचे कामकाजात व्यस्त होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,कामकाजात असताना त्याठिकाणी येऊन उपरोक्त लोकांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेनंतर महावितरण कर्मचारी आणि अधिकारी वर्गातून संताप व्यक्त केला जात असून, कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत.