साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे दिले पत्रआरंभ मराठी / ढोकी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने निर्माण झालेला तणाव कायम असतानाच माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना ‘तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करू, अशी धमकी देण्यात आली आहे. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे एका पाकीटमध्ये 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची ही चिठ्ठी देण्यात आली आहे. या नव्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, याप्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पोलिस यंत्रणा तपास कामाला लागली आहे.
आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ढोकी येथील तेरणा साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यात येत आहे.डॉ. सावंत यांचे पुतणे केशव उर्फ विक्रम सावंत हे कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. कारखान्याचा द्वितीय हंगाम सुरू असून, रविवारी रात्री दहाच्या सुमारास कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊस घेऊन कारखान्याकडे येत असताना तेर -ढोकी रस्त्यावर मुळेवाडी पाटीनजीक ट्रॅक्टर चालकास दुचाकीवर आलेल्या दोघांनी अडवून बंद पाकीट दिले. त्यांनी हे पाकीट कारखान्याच्या गेटवर देण्यास सांगितले.
ट्रॅक्टर चालकांनी कारखान्यावर आल्यानंतर हे पाकीट सुरक्षारक्षक संजय निंबाळकर व सुनील लंगडे यांच्याकडे पाकीट जमा केले. बंदिस्त पाकीट आल्यामुळे सुनील लंगडे यांनी कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांना फोन करून कल्पना दिली. त्यानंतर मच्छिंद्र पुंड यांनी कारखान्यावर येऊन पाकीट उघडून बघितले असता मध्ये शंभर रुपयांच्या नोटे सोबत एक चिठ्ठी लिहिलेली आढळली.
धनंजय आणि केशव सावंतांच्या नावाचा उल्लेख
या चिठ्ठीवर माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांचा नामोल्लेख करत तुमचा संतोष देशमुख मस्साजोग करू असा धमकीचा इशारा दिला होता.या घटनेनंतर शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनील लंगडे, संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोप विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ढोकी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.