प्रतिनिधी / धाराशिव
एकीकडे खासगी वाहतुकीची स्पर्धा सुरू असताना एसटी महामंडळ कासव गतीने वाटचाल करत आहे.प्रवाशांना जलद सेवा देण्याची गरज असताना सातत्याने नवनव्या अडचणीमुळे एस टी सेवा मागे पडत आहे. आता कंडक्टरला देण्यात आलेल्या तिकिटाच्या मशिन खराब निघाल्याने बस भर रस्त्यात थांबवाव्या लागत आहेत. आज सकाळी धाराशिव – सोलापूर ही बस तिकीट मशीन बंद पडल्याने अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ एलआयसी कार्यालयासमोर थांबवावी लागली.
दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरला जाणारी बस तिकीट मशीन खराब झाल्यामुळे पाऊण ते एक तास रस्त्यात थांबली होती. मशीन दुरुस्तीसाठी कंडक्टरला आगारात जावे लागते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. आज सकाळी धाराशिव – सोलापूर बसमध्ये असा प्रकार घडला. त्यानंतर कंडक्टरला आगारात जावे लागले. तोपर्यंत बस जागीच थांबून होती.याबाबत प्रवाशांनी ड्रायव्हरला विचारणा केली असता उर्मटपणे उत्तरे दिली जातात. धाराशिव आगारात हा प्रकार वारंवार घडत आहे. मात्र महामंडळ त्यासाठी कोणत्याही उपाययोजना करायला तयार नाही.नवीन प्रकारच्या मशीन आल्यामुळे कंडक्टरला हाताळण्यासाठी अडचण येत असल्याने अडचणी येत असल्याचे सांगीतले जात आहे.
एकीकडे खाजगी वाहतूकदारांनी जलद आणि अत्याधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा परिस्थितीत एस टी महामंडळ मात्र आपला कारभार कासवतीने करत आहे. प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.