आरोपीला पोलिस कोठडी घेतली नाही,पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची कारवाई
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुल या शाळेत मागील आठवड्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शाळेतील एका शिक्षकाने त्याच शाळेतील शिक्षिकेला आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी संबंधित शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आता या प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गणेश जांभळे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे किंबहुना आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपात तपास करताना पीसीआर घेणे आवश्यक असते. पोदार शाळेच्या प्रकरणात देखील गुन्ह्याचे स्वरूप पाहता तपास अधिकाऱ्याने पीसीआर घेणे गरजेचे होते. परंतु, तपास अधिकारी जांभळे यांनी पीसीआर न घेता एमसीआर घेऊन या गंभीर प्रकरणात अप्रत्यक्षपणे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला.
पोलीस अधीक्षकांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन सहायक पोलिस निरीक्षक जांभळे यांना निलंबित करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी तीन अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली असून, यामध्ये एक पोलीस निरीक्षक, एक महिला सहायक पोलीस निरीक्षक व एक उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम या टीमला दिले असून, या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.