उद्या सकाळी धाराशिव शहरात,दुपारी तुळजापुरात संवाद मेळावा, कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेणार
टीम आरंभ मराठी / कळंब-ढोकी- शिराढोण-येरमाळा
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंतरवालीसारख्या गावात येण्यासाठी भाग पाडणारे मनोज जरांगे पाटील आज बुधवारपासून धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शिराढोण, कळंब, देवळाली, दहिफळ, येरमाळा आदी गावांमध्ये त्यांनी मराठा समाज बांधवाशी संवाद साधला. त्यांचे जागोजागी फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच, असा शब्द दिला.उद्या सकाळी नऊ वाजता त्यांची धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संवाद सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तुळजापुरात समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत तर कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते सोलापूरला रवाना होणार आहेत.
समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे समाजास कळंब तालुक्यातील देवळाली येथे संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण मिळणार असून त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. समाजातील युवकांनी कायदा हातात घेऊ नये. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करा, आत्महत्येचा मार्ग पत्करू नका, मी माझी नियत ढळू दिली नाही तुम्हीही जातीला डाग लागू देऊ नका, आंदोलनात फूट पडू देऊ नका.मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा असून, तो दिवस दूर नाही, शासनास आपण एक महिन्याचा अवधी दिला आहे.१४ ऑक्टोबरच्या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी देवळाली सोबतच ढोकी, कोलेगाव,कसबे तडवळे, माळकरंजा,ढोराळा, गोविंदपुर, निपाणी,गौरगाव आदी भागातून हजारो मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
मराठा समाजाचा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्याकरिता ढोकी येथे आठ युवकांनी आमरण उपोषण केले होते. यामध्ये कळंब तालुक्यातील देवळाली येथील प्रज्वल हुंबे व मुकेश जाधव यांचा समावेश होता. मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत लाक्षणिक उपोषण मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार गावोगाव सुरू असून देवळाली येथेही १९ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण सुरू आहे. लाक्षणिक उपोषणाचा आज १६ वा दिवस असून आजपर्यंत गावातील आबालवृद्धसह ६४ लोकांनी लाक्षणिक उपोषण केले आहे.
सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेवू
शिराढोण –
मराठा आरक्षण संवाद यात्रेत संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,कोणत्याही मराठा बांधवाने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. कुठलाही अनुचित प्रकार, जाळ पोळ न करता आपणास आरक्षण मिळवायचे आहे. सरकारच्या छाताडावर बसुन आरक्षण मिळवू. मरेपर्यंत मराठा बांधवांशी, माझ्या मराठा माता भगिनींशी गद्दार होणार नाही.
जरांगे पाटील यांच्या प्रतिक्षेत हजारोंच्या संख्येने शिराढोण येथील छत्रपती संभाजी राजे चौकात मराठा बांधव उपस्थित होते. जोरदार स्वागत करण्यात आल्यानंतर ते भारावून गेले. अत्यंत कमी वेळेत त्यांनी उपस्थित बांधवाशी संवाद साधून मने जिंकली. मराठा समाजाला आरक्षणाची नेमकी गरज का आहे, आरक्षण कसे मिळवायचे हेही त्यांनी स्पष्ट केले.