आरंभ मराठी विशेष
प्रतिनिधी / धाराशिव
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना फटका बसला. त्यावर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी,असे आदेश सरकारने दिले. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालीच नाही. गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला, त्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या. मात्र,त्याचेही पंचनामे केले जात नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा मिळत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना राज्यात सर्वत्र राबवली.
धाराशिव जिल्ह्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडत गेला, त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने मंडळनिहाय पावसाची आणेवारी काढून 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश वीमा कंपनीला दिले. मात्र विमा कंपन्यांनी ई पीक पाहणीमध्ये दाखवलेले क्षेत्र, महसूल मंडळ निहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी, अशी कारणे देऊन जास्तीत जास्त मंडळ वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात 20 तारखेनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडून पिकांचे राहिलेले नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नुकसानीसंदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत, मात्र आठ ते दहा दिवस होऊनही या शेतकऱ्यांचे कंपनीने पंचनामे केलेले नाहीत आणि त्यांच्या तक्रारी मान्य केलेल्या नाहीत.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन भारती गुरुजी म्हणाले,
जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्यांच्या तक्रारी मान्य होत नाहीत. शेतकऱ्यांच्या तक्रारी मान्य न केल्यास दोन दिवसात विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत.
50 टक्क्यांपेक्षा अधिक तक्रारी आल्यास पंचनामे
आत्तापर्यंत तालुक्यातून तेवीस हजार तक्रारी शेतकऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती कंपनीने दिलेली आहे. 50 टक्के पेक्षा जास्त तक्रारी आल्यास कंपनी सॅम्पल सर्वे रँडम पद्धतीने करण्याच्या तयारीत आहे.
राजाराम बर्वे,तालुका कृषी अधिकारी,वाशी
प्रक्रिया सुरू आहे
जिल्ह्यातून जेवढ्या तक्रारी आलेल्या आहेत, त्यावर प्रक्रिया चालू आहे. शेतकऱ्यांच्या काही समस्या असल्यास त्यांनी आमच्या तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा.
अमोल मुळे, विमा कंपनी, जिल्हा प्रतिनिधी
शेतकरी म्हणतात..
समाधान मते ,दहिफळ
26 तारखेला तक्रार दिलेली आहे,अजूनपर्यंत यादीत नाव आले नाही आणि पंचनामा पण झाला नाही.
–
अजय घोळवे ,सोनारवाडी
27 तारखेला नुकसान झाल्याची तक्रार दिली पण तरीही यादीत नाव आलेले नाही आणि कोणी शेतावर पंचनाम्यासाठी आलेलं नाही.