– सज्जन यादव, धाराशिव
गेली तीन महिने झाले मणिपूर हे राज्य प्रचंड मोठ्या प्रमाणात धुमसत आहे. तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत. गेली तीन महिने झाले हा विषय ज्वलंत आहे परंतु सामान्य माणसाला मणिपूरबद्दल फारसे गांभीर्य वाटत नव्हते. साहजिकच आहे ते. कारण भारताचाच भाग असला तरी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भागाबद्दल सामान्य माणसाला फारसे स्वारस्य असणार नाही. परंतु भारताच्या पूर्वेकडील टोक असणाऱ्या या प्रदेशातील एका अतिशय हृदयद्रावक घटनेने परवापासून रातोरात सर्वांच्या तोंडी मणिपूर यायला लागले. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यातील एका महिलेवर प्रचंड मोठ्या समुदायकडून अत्याचार करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संबंध देश गेली तीन दिवस झाले हळहळ व्यक्त करतोय. घडलेली ही घटना मे महिन्यातली आहे. परंतु त्या घटनेचे काही व्हिडीओ फुटेज आता व्हायरल झाल्यामुळे ही घटना उजेडात आली. ही घटना का घडली हे पाहण्या अगोदर मणिपूरमध्ये सध्या उदभवलेल्या मूळ प्रश्नाच्या मुळाकडे जाणे आवश्यक आहे.
मणिपूर हे प्रचंड मोठ्या डोंगरमाथ्याचा प्रदेश आहे. मतैई आणि कुकी किंवा झोमी हे दोन समाज प्रामुख्याने तिथे राहतात. कुकी समाज हा अनुसूचित जमातीत मोडतो तर मतैई समाज गैर आदिवासी आहे. या गैर आदिवासी मतैई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या दहा वर्षे जुन्या शिफारशीचा पाठपुरावा करण्याचे निर्देश १९ एप्रिल २०२३ रोजी मणिपूर उच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला दिले होते. याचाच अर्थ अनुसूचित जमातीच्या यादीत मतैई समाजाचा समावेश करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवरून सुरू झाल्या होत्या. याला विरोध म्हणून ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर नावाच्या गटाने तीव्र विरोध दर्शवला. या युनियनने आदिवासी एकता मार्च नावाची एक रॅली आयोजित केली. ज्यामुळे मतैई आणि कुकी हे हे दोन समाज आमने सामने आले.
राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न
या रॅली दरम्यानच काही हिंसक घटना घडल्या आणि मणिपूरची शांतता भंग पावली. त्यावेळी मतैई समाजात एक फेक व्हिडिओ मुद्दाम व्हायरल केला गेला ज्यामध्ये कुकी समाजाकडून मतैई समाजावर अत्याचार केले जात आहेत,असा खोटा प्रचार त्यातून केला गेला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा बदला म्हणून मतैई समाजाकडून कुकी समाजातील त्या दोन निष्पाप महिलांवर अत्याचार केले आणि त्याचे व्हिडीओ देखील मुद्दाम बनवण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार मणिपूरची लोकसंख्या २६.६ लाख आहे. या लोकसंख्येत मतैई समुदायाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५३% आहे. नागा समाजाचे प्रमाण २४% तर कुकी/झोमी सामाजाचे प्रमाण १६% आहे. मतैई समाजातील जवळपास ८३% लोक हिंदुधर्मीय आहेत. तर नागा आणि कुकी समाज हा प्रामुख्याने ख्रिश्चन धर्मीय आहेत.
बहुसंख्य असणारा मतैई समाज हा राज्याच्या मध्यभागी स्थायिक आहे. इम्फाळ हे मध्यभागी असणारे मोठे शहर आहे. या शहरात आणि आसपास मतैई समाज जास्त आहे.कुकी समाज शहरी भागात अपवादानेच आढळतो. कुकी समाज हा आजूबाजूच्या टेकड्यांवर आणि जिरीबामच्या खोऱ्यांमध्ये राहतो.
मतैई समाज हा लोकसंख्येने आणि राजकीय दृष्टीने देखील ताकदवान आहे. मध्यभागात राहत असल्यामुळे आणि राजकीय ताकद असल्यामुळे मतैई समाज मणिपूरमध्ये एकप्रकारे दादागिरी करतो. मणिपूरच्या ६० सदस्यांच्या विधानसभेत ४० आमदार हे मतैई बहुल भागातील असतात. तर फक्त २० आमदार हे कुकी समाज राहत असलेल्या आदिवासी टेकड्यांवरून येतात. विधानसभेत देखील या २० आमदारांना फारसे महत्व दिले जात नाही.
राजकीयदृष्ट्या ताकदवान असणारा मतैई समाज २०१२ पासून अनुसूचित जमातीच्या दर्जाची मागणी करत आहे. आपली संस्कृती, भाषा आणि ओळख जपण्यासाठी आणि संविधानिक सुरक्षा मिळावी म्हणून मतैई समाज मोठी ताकद लावून दहा वर्षे झाले सातत्याने ही मागणी करत आहे. विधानसभेत देखील मतैईंची संख्या जास्त असल्यामुळे तिथेही ही मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
दुसरीकडे अनुसूचित जमातीत मोडणारा कुकी समाज मतैई समाजाला अनुसूचित जमातीत घ्यायला विरोध करत आहे. कुकी समाजाचे असे म्हणणे आहे की, मतैई समाज राजकीयदृष्ट्या अगोदरच प्रबळ आहे. त्यात त्यांना एसटीचा दर्जा दिला तर आमच्या नोकरीच्या संधी कमी होतील. आणि आमच्या नैसर्गिक हक्कात मतैई समाज वाटेकरी होईल म्हणून कुकी समाजाकडून मतैई समाजाला एसटी दर्जा देण्यासाठी तीव्र विरोध होत आहे. राजकीय दृष्ट्या प्रबळ असून आणि बहुसंख्य असूनही अल्पसंख्य असणारा कुकी समाज आपल्या मागणीला विरोध करतो हा प्रचंड मोठा राग मतैई समाजात आहे. आणि तो राग गेल्या तीन महिन्यांपासून दिसत आहे.
दोन समाजात वाद
मतैई समाज हा कुकी आणि नागा यांच्या हक्काच्या डोंगराळ भागावर राजकीय प्रभाव आणि नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे असा आरोप कुकी समाजाकडून केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुरचंदपूर-खेपुम या भागात गेली कित्येक वर्षे कुकी आदिवासी राहतात. हा भाग एक संरक्षित वनक्षेत्र असून या वनक्षेत्रातील ३८ गावांवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतैई समाजाने राजकीय ताकद वापरून कुकींना अशा प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे. यात दुर्लक्षित राहिलेली विशेष बाब म्हणजे कुकी समाज राहत असलेल्या डोंगराळ भागात विपुल प्रमाणात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती. याच साधनसंपत्तीवर विश्वागुरूंचा आशीर्वाद असणाऱ्या लोकांचा डोळा आहे. कुकी समाज हा आदिवासी समाज आहे. हा समाज शेकडो वर्षे झाली डोंगरात आणि दऱ्याखोऱ्यात राहत आहे. हा कुकी समाज जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत तिथे उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीला ओरबाडता येणार नाही, हे खरे दुखणे आहे. त्यामुळे या ना त्या निमित्ताने हिंसाचार करून कुकी समाजाला तिथून बेदखल करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
केंद्राची भूमिका काय?
यात अतिशय महत्वाचा प्रश्न हा आहे की, मणिपूर एव्हढे धुमसत असताना केंद्र सरकार काय करत होते? २०१४ ला केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्या सरकारने ईशान्येकडील राज्यांसाठी काही चांगले निर्णय निश्चितपणे घेतले होते. दर आठवड्याला एक केंद्रीय मंत्री एका ईशान्येकडील राज्याचा दौरा करतील हा नियम मोदी सरकारने लागू केला होता. त्याप्रमाणे सुरुवातीची दोन तीन वर्षे ठीक गेली होती. परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून मोदी सरकारने मतांचे राजकारण करण्यास सुरुवात केली. जास्त मते असणारा समुदाय आपल्याकडे खेचून घ्यायचा आणि त्यांचा राजकीय फायदा घ्यायचा यामुळे ईशान्येकडील राज्यात बहुसंख्य असणाऱ्या समाजाकडून अल्पसंख्य असणाऱ्या समाजावर अन्याय वाढायला लागलेले दिसतात. मणिपूर गेले तीन महिने अस्वस्थ असले तरी पंतप्रधानांनी ना त्याच्यावर काही टिप्पणी केली, ना मणिपूरचा एखादा दौरा केला. दोन महिलांचा अतिशय वाईट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ काही सेकंदाची प्रतिक्रिया दिली. ईशान्येकडील राज्य बांगलादेश आणि चीनला चिटकून असल्यामुळे केंद्राचे या राज्यांकडे विशेष लक्ष असायला हवे परंतु तसे दिसत नाही. ईशान्येकडील राज्यातील असंतोषाचा फायदा शत्रू राष्ट्र घेणारच नाहीत असे म्हणता येत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर निषेध व्यक्त करण्याशिवाय सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. खरी जबाबदारी सरकारची आहे, कारण हे प्रश्न अतिशय जटील आहेत.
–mobile number +919689657871