प्रतिनिधी / धाराशिव
मणिपूर राज्यात स्त्रियांवर झालेल्या अमानवी कृत्याबद्दल धाराशिवकर स्तब्ध झाले. रविवारी सकाळी शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकारांनी तासभर मौन सत्याग्रह केले. तसेच मानवतेला काळिमा फासणाऱ्या देशविघातक कृत्याच्या निषेधार्थ संताप व्यक्त केला.
मणिपूर राज्यात मागील तीन महिन्यांपासून हिंसाचार, दंगल, जाळपोळ, सैनिकांवर हल्ले आणि महिला अत्याचार सुरूच आहेत. महिलांवर झालेला सामूहिक अत्याचार किळसवाणा आणि संतापजनक आहे. या सगळ्या संतापजनक प्रकाराचा जाहीर निषेध करण्यासाठी धाराशिव शहरात मौन सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने यात सहभागी झाले होते.धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दत्ताभाऊ बंडगर,सगुणा आचार्य, सोमनाथ गुरव,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, डॉ. प्रतापसिंह पाटील, संजय दुधगावकर,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,अय्याज शेख,खलिफा कुरेशी,काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. स्मिता शहापुरकर, प्रशांत पाटील, सय्यद खलील,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,अनुराधा लोखंडे, नाना घाटगे, संकेत सूर्यवंशी, रवी वाघमारे,यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तत्पूर्वी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले.
मंगळवारी महिलांचा मोर्चा
मणिपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातून मंगळवारी सकाळी 10 वाजता महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील जिजाऊ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉ स्मिता शहापूरकर यांनी दिली.या मोर्चामध्ये जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.