पोलिस म्हणतात, स्वतःच्या अन् दुसऱ्यांच्या हक्कांची काळजी घ्या
शाम जाधवर / कळंब
सरत्या वर्षाला निरोप अन नवीन वर्षाचे स्वागत करताना आजचा दिवस थर्टी फर्स्ट म्हणून साजरा करण्याची पाश्चिमात्य संस्कृती आज आपल्या देशात बऱ्यापैकी रुजलेली आहे. नव वर्षाचे स्वागत आपल्या प्रिय जणांसोबत करण्यात गैर असे काहीच नाही. परंतु नव वर्षाचे स्वागत नशेच्या आहारी जाऊन शांतता बिघडविण्याचा प्रयत्न होतो. नववर्षाचे स्वागत करताना सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन धिंगाणा घातल्यास किंवा गाडी चालविल्यास पोलिसांच्या कारवायांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
नव वर्षाचा जल्लोष साजरा करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनच असा सल्ला पोलिस निरीक्षक साबळे यांनी दिला. रस्त्यावर उभे राहून धिंगाणा करणे, इतरांना त्रास होईल असे वागणे, दारू किंवा इतर नशा करून गाडी चालवणे यावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला.
ड्रिंक अँड ड्राईव्ह,अशी आहे शिक्षा
वाहन अधिनियमन कायदा 2019 च्या कलम 185 नुसार, भारतात दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेत वाहन चालवणं हा गुन्हा आहे.वाहन चालवणाऱ्याच्या 100 मिलीलिटर रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल सापडलं तर त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. तुम्ही पहिल्यांदा या गुन्ह्यात सापडले असाल, तर 10 हजार रुपयांचा आर्थिक दंड होऊ शकतो. सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूदही कायद्यात आहे.
..तर गुन्हा दाखल होतो
ओव्हरस्पिडिंगच्या पहिल्या गुन्ह्यात 400 रुपये दंड आहे पण आपण 200 रूपये तडजोड शुल्क भरू शकतो मात्र ड्रिंक अँड ड्राईव्ह हा जामीनपात्र गुन्हा आहे, गुन्हा दाखल होत असल्यानं एफआयआर होते, चार्जशीट दाखल होते.
गुन्हा परत झाला तर ?
पहिला गुन्हा घडल्यानंतर तीन वर्षांच्या आत दुसरा गुन्हा घडला तर 15 हजार रूपये दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.
तिसऱ्यांदा सापडायचा पराक्रम केलात, तर तुमचे लायसन्सच रद्द होऊ शकतं. त्यामुळे नवीन वर्ष साजरे करा परंतु कायच्याच्या चौकटीत राहूनच असा सल्लाही त्यांनी दिला.
कळंब तालुक्यामध्ये वर्षभरात आतापर्यंत २५ च्या जवळपास ड्रिंक अँड ड्राईव्ह चे गुन्हे नोंदवलेले आहेत. आज ३१ डिसेंबर रोजीही कळंब पोलिसांची या सर्व गोष्टीवर करडी नजर राहणार आहे असेही त्यांनी नमूद केले.