प्रतिनिधी / भूम
तालुक्यातील सामन येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी आरोग्य तपासणी शिबिराला भजनी मंडळ तसेच वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या तपासणी शिबिरात 11 हजार 295 वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून रविवारी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
तीर्थक्षेत्र सामनगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या तपासणी शिबिरात भूम, परंडा तसेच वाशी तालुक्यातील वारकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत जनतेसाठी राज्यभरात कायमच आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवत असतात. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी भूम तालुक्यातील सामनगाव येथील ‘सद्गुरू शामनाथ महाराज देवस्थान’ येथे वारकरी बंधू-भगिनी आणि मातांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, यावेळी शिबिरात सहभागी वारकऱ्यांना मोफत तपासणी, उपचार आणि मोफत औषधे देऊन आरोग्यसेवा करण्यात आली. सदर शिबिराला वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून आपल्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक शंकांचे निरसन करून घेतले आणि या शिबिराचा लाभ घेतला.
हभप निवृत्ती महाराजांचे कीर्तन
या शिबिरात समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या सुश्राव्य अशा हरी कीर्तनाचा उपस्थितांनी आनंद लुटला. शिबिराला भूम-परंडा-वाशी परिसरातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, नागरिक व वारकरी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.