मोहा आणि पिंपळगाव येथील आरोपींना शिताफीने अटक
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरालगत असलेल्या आंबेहोळ शिवारात वयोवृद्ध जोडप्यांना अडवून, चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रक्कम लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांना यश आले आहे. ही घटना 23 जुलै रोजी घडली होती. अटक करण्यात आलेले आरोपी शहरातील कुरणे नगर येथे वास्तव्य करून गुन्ह्यांसाठी माहिती घेत होते,अशी माहिती समोर आली आहे. हे आरोपी कळंब तालुक्यातील मोहा आणि वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील आहेत. अन्य एकजण फरार आहे.
अंबेहोळ येथील चाँद शाहाबुद्दीन शेख ( वय 65 ) हे 23 जुलै रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान त्यांच्या पत्नीसह धाराशिव येथून आंबेहोळ गावाकडे जात असताना हॉटेल बालाघाटच्या पुढे मोटरसायकलवर तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला अडवून त्यांना मोटरसायकल वरुन उतरुन खाली पाडले तसेच वयोवृध्द महिलेच्या हातावर चाकूने वार करुन चाँद शेख यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांना चाकुचा धाक दाखवूनन सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15,000 रुपये लुटून नेले होते. चाँद शेख यांच्या तक्रारीवरुन धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुरनं 314/2024 कलम 309(6),115(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा अत्यंत क्लिनिष्ठ व गंभीर स्वरुपाचा असल्याने व कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखा अंनिन धाराशिव शहर पोलिसांनी संयुक्तरित्या गुन्ह्याचा तपास केला.अत्यंत चिकाटीने, कौशल्यपुर्ण तसेच तांत्रिक विश्लेषणावरुन पोलिसांनी गुरुवारी आरोपी दिनेश नागनाथ काळे, (वय 20 वर्षे, रा. मोहा ता. कळंब, ह.मु. कुरणे नगर धाराशिव) आणि काका शंकर शिंदे (वय 21 वर्षे, रा. पिंपळगाव (क) ता. वाशी) यांना कुरणे नगर येथून ताब्यात घेवून त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेले होंडा सीबी शाईन मोटरसायकल, लुटमार केलेले नगदी 15,000 रुपये, सोन्याचे 9 ग्रॅम वजनाचे दागिने, असा एकुण 1लाख 12 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीना पुढील कारवाईसाठी धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार/विनोद जानराव, हुसेन सय्यद, प्रदीप वाघमारे, मनोह/ शैला टेळे, पोलीस नाईक/ नितीन जाधवर, बबन जाधवर,रवींद्र आरसेवाड, पोलीस अमंलदार /सुनिल मोरे (TAW, चालक पोलीस अंमलदार/ प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड, पोलीस ठाणे धाराशिव शहर येथील पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार, अमोल मंगरुळे यांच्या पथकाने केली आहे.