आरोपींकडून गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे जप्त
आरंभ मराठी / धाराशिव
दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या तीन जणांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यावेळी दोन आरोपी मात्र फरार झाले. पकडलेल्या तीन आरोपींकडून गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे, कोयता, दोन दुचाकी आणि एक चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.
शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरुन सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, विनोद जानराव, वाघमारे, जाधवर,चालक पोहेकॉ अरब, दहीहांडे, बोईनवाड यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत पेट्रोलिंग करत होते.
दिनांक 17 जून रोजी रात्री साडेसात वाजता तेरणा कॉलेज येथे पथक आले असता, पथकास गोपनिय माहिती मिळाली की, विमानतळाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला धाराशिव येथे चार ते पाच व्यक्ती एक चार चाकी कार व तीन मोटरसायकल सह अंधारामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत संशईतरित्या थांबले आहेत.
खात्रीशीर बातमी मिळाताच पथकाने लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन शासकीय वाहन एका जागी लावले. आणि पायी चालत जात असताना तेथे थांबलेल्या व्यक्तींपैकी दोन व्यक्तींनी पोलिसांना पाहताच मोटरसायकलवर बसून पळ काढला.
खाली बसलेले इतर तीन साथीदार पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी (वय 47 वर्षे,रा.अरिवला (फुलपुर)ता. भानपुर जि. बस्ती राज्य उत्तरप्रदेश), निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण (वय 32 वर्षे रा. काकानगर ता. जि. धाराशिव) आणि मुकेश शाम शिंदे (वय 24 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव) या तिघांना ताब्यात घेतले.
आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल अंदाजे 75,000 रुपये किंमतीचे, तीनन जिवंत काडतुसे अंदाजे 600 रुपये, एक लोखंडी कोयता 200 रुपये, एक हयुंडाई कंपनीची संट्रो कार अंदाजे 2,30,000 रुपये व एक बुलेट मोटरसायकल अंदाजे 1,55,000 रुपये किंमतीची व होंडा ॲक्टीवा स्कुटी अंदाजे 45,000 रुपये असा एकुण 5,05,800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे नमुद आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. व तिन्ही आरोपींना मालासह धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.