आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरात आनंदनगर पोलीस स्टेशनच्या जवळून एका पायी जाणाऱ्या महिलेचे गंठन दोन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन चोरून नेल्याची घटना घडली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, निर्मला रविकांत देशमुख (वय 43 वर्षे, रा. वैष्णवी नगर छायादिप लॉन्सच्या पाठीमागे धाराशिव) या मंगळवारी (दि.17) सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील राधिका बारच्या बाजूच्या रोडवरून पायी जात होत्या.
त्यावेळी अनोळखी दोन व्यक्तींनी मोटरसायकलवर येवून निर्मला देशमुख यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरीने हिसकावून चोरटे पसार झाले. आनंदनगर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
निर्मला देशमुख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 304(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धाराशिव शहरात सोनसाखळी चोरट्यांनी हैदोस घातला असून, बस स्थानक परिसरात आणि शहरातील मुख्य रस्त्यावर वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत.
शहरात सोनसाखळी चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.