आरंभ मराठी / वाशी
मोजणी झालेल्या शेतजमिनीत हद्दीच्या खुणा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक दिगंबर मारुती ढोले (वय 45, मूळ रा. हदगाव, ता. पाथरी, जि. परभणी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, 55 वर्षीय तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेल्या (गट क्र. 444) शेतजमिनीची मोजणी आणि हद्द कायम करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दिला होता. त्यानुसार 7 मे 2025 रोजी या जमिनीची मोजणी लिपिक दिगंबर ढोले यांनी केली होती.
यानंतर त्यांनी शेतजमिनीच्या हद्द कायम खुणा करण्यासाठी तक्रारदाराकडे 3000/- रुपयांची लाच मागितली होती.याबाबत तक्रारदाराने दिनांक 23 मे 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी दिनांक 26 मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली असता, आरोपीने खरोखरच लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले.
तडजोडीनंतर आरोपीने 2000 रुपये घेण्यास तयार असल्याचे सांगितले. दोन हजार रुपये स्वीकारत असतानाच आरोपीला ताब्यात घेतले. आज (दि.27) तक्रारदाराकडून पंचासमक्ष 2000/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना आरोपी दिगंबर ढोले याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
आरोपीची घरझडती सुरू असून मोबाईलमधील डेटा तपासणीसाठी मोबाईल देखील ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यावेळी सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड, सापळा पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, यांच्यासह आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, दत्तात्रय करडे यांनी कारवाई केली.
शासकीय कार्यालयांमध्ये कोणी लाच मागत असल्यास 1064 या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.