प्रतिनिधी / धाराशिव
कलाकारांच्या कलेतून नवनवीन कला जन्माला येत असतात. धाराशिव शहरातील पांचाळ बंधूंनी आपल्या कलेतून अनेक नवे प्रयोग केले आणि त्यांच्या या प्रयोगाची दखल महाराष्ट्राने घेतली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती स्थापनेच्या पार्श्वभूमीवर पांचाळ बंधूंनी शिस पेन्सिलच्या टोकावर अत्यंत सूक्ष्म आजारात प्रभू श्रीराम यांची मूर्ती कोरली आहे.आजवर त्यांनी पेन्सलवर विठ्ठलाची मूर्ती कोरली होती.विशेष म्हणजे त्यांनी ही मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शाहू नगर भागातील प्रफुल्ल आणि प्रकाश पांचाळ बंधूंनी प्रभू श्रीराम मूर्ती पेन्सिलवर कोरली असून, ही मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना अवघा दीड ते दोन तास वेळ लागला.यापूर्वी त्यांनी पेन्सिलच्या लीडवर विट्ठल, रुक्मिणी, वारकरी दिंडी, साधू,पक्षी, लाकडामध्ये अखंड साखळी व घुंगरु आदी वस्तू तयार केल्या आहेत. दरम्यान नुकत्याच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या महाकालची मूर्ती कालीचरण महाराजांना भेट दिली. प्रफुल्ल व प्रकाश पांचाळ यांनी एकमेकांच्या मदतीने आजवर अनेक वस्तू बनवल्या आहेत. या वस्तू आवड व छंद असल्यामुळे बनवल्या आहेत. याबाबत सांगताना प्रफुल्ल पांचाळ म्हणाले, खूपच सूक्ष्म वस्तू असल्याने सुरुवातीला कामामधे काही वस्तू तूटल्याही. नंतर हळू हळू हात बसला व आता पहिल्याच प्रयत्नात यश येऊ लागला. सध्या अयोध्या येथील प्रभु श्री रामांच्या मूर्ती स्थापनेविषयी देशभरात कुतूहल व उत्सुकता आहे. त्याच उत्सुकतेतून प्रभु विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने कलेच्या माध्यमातून प्रभु श्री रामांची मूर्ती पेन्सिलच्या लीडवर साकाराली आहे.त्यांच्या या कलेचे कौतुक केले जात आहे.