आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणप्रश्नी हैद्राबाद गॅझेटीयरच्या अनुषंगाने धाराशिवच्या जिल्हा समितीने घेतलेल्या मेहनतीला मोठे यश आले आहे. या समितीच्या दोन वेळा झालेल्या तपासातून तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातून महत्वाचे दस्तावेज उपलब्ध झाले असून, या कागदपत्रांचा कुणबी नोंदीच्या अनुषंगाने मोठा उपयोग होईल,असा विश्वास व्यक्त करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या समितीच्या नेमणुकीसाठी तसेच दस्तावेज उपलब्ध करून ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा केला होता.
धाराशिव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या समितीने दुर्मिळ दस्तऐवजामधून अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून घेतली आहेत. तज्ञांकडून त्याचा सर्वांगाने अभ्यास सुरु आहे. कोणावरही अन्याय न करता मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयायासाठी राज्य सरकारला त्यातून मूलभूत पुरावे उपलब्ध होतील असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर निर्णय घ्या – आमदार पाटील
आमदार राणा पाटील यांनी म्हटले आहे की, मागील सहा दिवसापासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असून, याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचे महत्व विचारात घेऊन जेष्ठ विधीज्ञ, मनोज जरांगे पाटील यांनी प्राधिकृत केलेले वकील यांच्यासह संबंधितांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अशी विनंती केली आहे.तसेच पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील याबाबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योग्य मार्ग निघेल
उपलब्ध झालेल्या दस्ताऐवजात हैद्राबाद गॅझेटीयरसह इतर अनेक कागदपत्रांचाही समावेश आहे. जेष्ठ विधीज्ञ तसेच मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे-पाटील यांच्याशी संबंधित कायदे सल्लागार यांच्यासह याबाबत आढावा बैठक आयोजीत केल्यास यातून योग्य कायदेशीर मार्ग निघण्यास सहकार्य होईल. त्यानुसार आढावा बैठक आयोजित करण्याची आग्रही विनंती आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
समितीमध्ये जाणकार मंडळी
आपल्या सूचनेनुसार कुणबी नोंदीचे दस्तावेज शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली होती. या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह, तहसिलदार, मोडी व उर्दू लिपी जाणकार, तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बुवा यांच्यासह स्थानिक युवकांनाही समाविष्ट करून घेण्यात आले होते.
समितीने दोनवेळा घेतला शोध
दोन वेळा या समितीने हैदराबाद येथील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन केंद्रातील निजामकालीन कागदपत्रांचा धांडोळा घेऊन अनेक महत्वाची कागदपत्रे स्कॅन करून आणली आहेत, ज्याचा राज्य सरकारला न्यायालयीन पातळीवर देखील मोठा लाभ होऊ शकतो असा विश्वास आहे. पहिल्या भेटीतील कागदपत्रे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत या बाबींचा आढावा घेणार आहे.
तरुणांनो, टोकाचे पाऊल उचलू नका
तरुण बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये
धाराशिव तालुक्यातील कोंबडवाडी येथील परमेश्वर मिसाळ व पाटोदा येथील शिवाजी निलंगे या युवकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नाराजीतून आत्महत्या केली आहे. त्यामुळे मिसाळ आणि निलंगे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. लवकरच आशादायक निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबातील सदस्यांना दुःखाच्या खाईत लोटू नये,असे विनम्र आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे.