शिवसेनेचे काय..महाविकास आघाडी राहणार की जाणार..?,
काँग्रेसच्या नेत्याच्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
प्रतिनिधी / धाराशिव
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्ह्यात दोलायमान परिस्थिती झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून धक्के बसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असलेली धाराशिव लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडावी,अशी मागणी नेतृत्वाकडे करणार असल्याची भूमिका माजी मंत्री,आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून ही जागा शिवसेनेकडे असून, काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे महाविकास आघाडी राहणार की जाणार,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
धाराशिव येथे गांधी स्मृती भवन येथील काँग्रेस कार्यालयाच्या सभागृहात आज त्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.यावेळी त्यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेची जागा आपल्याकडे घ्यावी,अशी मागणी केली होती. त्याचा संदर्भ देत आ.देशमुख म्हणाले, लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांच्या एकविचारातून जे नाव समोर येईल त्या नावाची शिफारस आम्ही करू. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आणि इतर पदाधिकार्यांसमवेत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, पक्षाचे निरीक्षक विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैलय उटगे, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव जितेंद्र देहाडे, मांजरा शुगर उपाध्यक्ष रवी काळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग
आ.देशमुख म्हणाले, धाराशिव जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी या मतदारसंघातून खासदार, आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत. म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला सोडावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापुढील निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल, असा दावाही त्यांनी केला.
तत्पूर्वी गांधी स्मृतीभवन कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकार्यांसह जिल्हा बँक संचालक महेबुब पटेल, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कफील सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष संगीता कडगंचे, माजी सभापती रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भागवत धस, माजी सभापती मुकुंद डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. स्मिता शहापूरकर, आशिष मोदाणी, कृऊबा समिती संचालक उमेश राजेनिंबाळकर, परंडा तालुकाध्यक्ष अॅड. हनुमंत वाघमोडे, भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, वाशी तालुकाध्यक्ष राजेश शिंदे, मागासवर्ग विभाग जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे इतर, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, विधी विभाग प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित शिंदे, रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस, मानवाधिकार प्रदेश सचिव प्रभाकर लोंढे, माजी तालुकाध्यक्ष दिलीपसिंग देशमुख, शहाजहान शिकलगार, शशी निरफळ, दर्शन कोळगे, शैलेश देव, सचिन गायकवाड, माजी शहराध्यक्ष अशोक पवार, सुभाष वाघमारे, अशोक बनसोडे, वसंत मडके, अॅड. जावेद काझी, जिल्हा सचिव विनोद वीर, पंस सदस्य अश्रुबा माळी,औसा तालुकाध्यक्ष सूर्यवंशी ,ज्योती सपाटे,अंजली ढवळे,परंडा शहराध्यक्ष रमेश परदेशी सरफराज काझी परंडा विधानसभा युवक अध्यक्ष दत्ता तांबे, कोहिनूर सय्यद, अनंत घोगरे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, उस्मान कुरेशी, मुहिब अहमद, शहाजी मुंडे, दौलतराव माने, अवधूत क्षीरसागर, भूषण देशमुख, अमोल कुतवळ, आरेफ मुलाणी, अशोक भातलवंडे, शाकेर शेख, काकासाहेब सोनटक्के आदींसह पदाधिकारी, कायकर्ते उपस्थित होते.
दोन काँग्रेसमध्ये पुन्हा वाद ?
राज्य पातळीवर आघाडी असताना जिल्ह्यात मात्र कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये कायम बेबनाव होता. महाविकास आघाडी स्थापन होऊन राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. मात्र या काळात जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस गलितगात्र झाली. तुलनेने शिवसेनेला बळ आले. दुसरीकडे चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपलाही अच्छे दिन आले.आता पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना-भाजप रस्सीखेच सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम चेहरा दिसत नाही. रविवारी साहेबांचा संदेश घेऊन आलेल्या आमदार रोहित पवार यांच्या मेळाव्यानंतर काही मिनिटांतच काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी शहरात येऊन लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आग्रही राहू अशी भूमिका घेतल्याने व शिवसेनेचे विद्यमान खासदार असूनही जागा काँग्रेसने मागितल्याने आघाडीत तणाव वाढणार आहे.आघाडीत धाराशिव लोकसभेची जागा परंपरेने राष्ट्रवादीच्या वाट्याला असून, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राहीला तर जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा वर्गही मोठा आहे. मात्र, पक्षाची होत असलेली अवस्था लक्षात घेऊन काँग्रेसने कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे.