ढोकीच्या कारखान्यावर भव्य सभा, पालकमंत्री डॉ. सावंत खासदार-आमदारांवर कडाडले, लायकी नसलेल्यांना खासदार -आमदार बनवले
आरंभ मराठी / धाराशिव
मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा संकल्प मेळावा तालुक्यातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात बुधवारी दुपारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या कामाचे कौतुक केले तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या दाढीकडे तुमच्या नाड्या आहेत. मला हलक्यात घेऊ नका. दोन वर्षापूर्वी जे झाले ते अवघ्या जगाने पाहिले आहे. मी मर्द आहे, हे सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते,असा घणाघात केला तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
शिवसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्यासाठी तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत. मोदींचे हात बळकट करायचे आहेत. एकजुटीचे दर्शन घडवायचे आहे.त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्याने आपल्या राज्यातले सरकार आणायचे आहे. आपल्याला गावागावात संघटना वाढविण्याचे काम करायचे आहे. शिवसैनिक तयार करा, शासन आणि जनतेच्या मधला दुवा बना. तुम्ही सगळेजण एकनाथ शिंदे बनून काम करा. मी जनतेचा सेवक बनून काम करत राहील. संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. हे प्रेमाचं, जिव्हाळ्याचे नाते मजबूत करूयात.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?
मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण दिले. त्याला धाडस लागते. सर्व समुदायाला सोबत घेऊन पुढे जात आहोत. खरेतर मराठा समाजाने यापूर्वी अनेकांना मोठे केले.मात्र काही तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाला वंचित ठेवले. संधी होती तेंव्हा सत्तेचा वापर केला नाही.आम्ही लोकाभिमूख निर्णय घेतला. राज्यातील जनतेला अनेक सुविधा देत आहोत. शब्द देतो तो पाळतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो. सिंचनाचे 45 प्रकल्प मंजूर केले. 10 लाख हेक्टर ओलीताखाली येईल. समृध्दी महामार्ग, कोकण-गोवा हा मार्ग जोडला जाईल.सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन रेल्वे मार्गासाठी 495 कोटींची मंजूरी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बासनात गुंडाळली होती,त्या योजनेला पुन्हा मंजूरी दिली.
लायकी नसलेल्यांना खासदार-आमदार केले–
डॉ.तानाजी सावंतांचा पुन्हा एकदा गंभीर आरोप
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांनी सहकार क्षेत्र अक्षरश: संपुष्ठात आणले आहे. साखर कारखाने, दुध संघ मोडीत काढले. भैरवनाथ समुहाने तेरणा कारखाना चालवायला घेतला. या भागातील कारखान्यांच्या तुलनेत अधिकचा भाव दिला. इथल्या नेत्यांनी या कारखान्यातले भंगार विकले, डीसीसी बँकेची वाट लावली, बँकेच्या ठेवी मिळत नाहीत. काही सभासद मयत झाले आहेत. तेरणा कारखाना सुरू करताना अदृश्य शक्ती म्हणजे माझे एकनाथ शिंदे सोबत होते.त्यांनीच लातूरच्या नेत्याला सांगितले,सावंत यांना कारखाना चालविण्याचा अनुभव आहे. शेतकऱ्यांची कामे करतात. त्यानंतर लातूरच्या लोकांनी कोर्टातल्या सगळ्या केसेस विड्रॉ केल्या. माझ्या जिवात जिव असेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांची साथ सोडणार नाही. अडगळीत पडलेल्या लोकांना मी खासदार, आमदार केले. लायकी नसलेल्यांना मोठे केले. कारखान्याचे भंगार विकले गेले. अडीच वर्षात सगळे कॉन्ट्रॅक्ट नात्यागोत्याला दिले गेले.घाम गाळणाऱ्या शिवसैनिकांचा विचार केला गेला नाही.