जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रम
प्रतिनिधी / अणदूर
अणदूरच्या मातीतच नवरत्नाची खाण असून, साता समुद्रापलीकडे अणदूरचा नावलौकिक होत आहे. अणदूरचे हे नाव पुढे नेण्याचे काम विविध क्षेत्रातून युवा पिढी करीत असल्याचा आपणास अभिमान असून, तो सातत्याने पुढे न्यावा व जुन्या पिढीने त्यांना हातभार लावावा, अशी अपेक्षा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली.
जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवरत्नांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र आलुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, श्री श्री गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे उपस्थित होते.प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि अणदूरचे प्रथम पत्रकार स्वर्गीय शिवशंकर आलूरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सरपंच रामचंद्र आलूरे, डॉ.जितेंद्र कानडे, डॉ. नागनाथ कुंभार यांच्या हस्ते डॉ. नितीन ढेपे यांना वैद्यकीय क्षेत्रातील, डॉ. जयप्रकाश संघ शेट्टी यांना वैज्ञानिक, डॉ. इब्राहिम नदाफ यांना शिक्षण, प्रवीण घुगे यांना राजकीय, विनोद घुगे यांना पोलीस प्रशासन, शंकर दुपारगुडे यांना पत्रकारिता, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांना प्रशासन, बाबाजी चव्हाण यांना उद्योग तर विजयकुमार कांबळे बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अणदूर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील दैदिप्यमान पिढीचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणा देणार असून,आई-वडील आणि गुरुजनांचा आदर्श व त्यांच्या मेहनतीचा प्रामाणिकपणे विचार करून गावच्या वैभवात व विकासाला चालना देण्याचे आवाहन चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. जितेंद्र कानडे, प्रवीण घुगे,डॉ. नितीन ढेपे, पत्रकार शंकर दुपारगुडे यांनीही जय मल्हार पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास डॉ. अनिता मुदकन्ना, श्रीमंत मुळे गुरुजी, चंद्रशेखर आलुरे गुरुजी काशिनाथ शेटे, प्रमोद कांबळे, बालाजी घुगेंसह ग्रामस्थ, महिला, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. बी.बिराजदार, प्रास्ताविक दयानंद काळुंखे तर आभार शिवशंकर तिरगुळे यांनी मानले.