आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील चार एसटी बसस्थानकांच्या विकासकामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मागील वर्षी धाराशिव आणि तुळजापूर येथील बस स्थानकांचे नवीन बांधकाम केल्यानंतर आता आणखी चार बस स्थानकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील वाशी, अणदूर, शिराढोण आणि कळंब येथील बसस्थानकांच्या वाहनतळांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
या चारही कामांसाठी एकूण १३ कोटी ९१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील एसटी बसस्थानकांच्या वाहनतळांवर अनेक ठिकाणी खड्डे, धूळ, चिखल तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्यांमुळे प्रवाशांना आणि एसटी कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर चार बसस्थानकांच्या वाहनतळांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
बसस्थानकनिहाय मंजूर निधीमध्ये वाशी बसस्थानकासाठी ३ कोटी ६६ लाख रुपये, अणदूर बसस्थानकासाठी १ कोटी ८ लाख रुपये, शिराढोण बसस्थानकासाठी ४ कोटी ४५ लाख रुपये, तर कळंब बसस्थानकासाठी ४ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही कामांसाठी एकूण १३ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या विकासकामांमुळे बसस्थानक परिसरातील वाहनतळ अधिक सुस्थितीत होऊन प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच एसटी बसची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, बसस्थानक परिसरात चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. मंजूर कामे लवकरात लवकर सुरू होऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.










