आरंभ मराठी / धाराशिव
एकीकडे राज्य सरकारकडून वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचे उपक्रम राबवून नागरिकांना पर्यावरण जपण्याचे आवाहन केले जात असताना, धाराशिव शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मात्र याच्या विपरीत चित्र पाहायला मिळत आहे. महाविद्यालय परिसरातील २५ ते ३० वर्षे वयाच्या असंख्य वृक्षांची मंगळवारी (दि.२४) कत्तल करण्यात आली.
विशेष म्हणजे, या वृक्षतोडीसाठी वन विभाग अथवा नगरपालिकेची परवानगी घेतल्याचे समोर आले नसल्याने या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक भागांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पाण्याची टंचाई, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, धाराशिव शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय परिसरातील जुन्या वृक्षांची सर्रास कत्तल झाल्याने पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून परिसरात वृक्ष लागवडीचे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. एनसीसी, एनएसएस तसेच विद्यार्थ्यांनी श्रमदानातून महाविद्यालय परिसरात विविध प्रकारची झाडे लावली होती. वर्षानुवर्षे जोपासलेल्या या वृक्षांमुळे महाविद्यालय परिसर हिरवागार झाला होता. उन्हाळ्यात सावली, परिसरातील वातावरणातील गारवा आणि महाविद्यालयाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम या वृक्षांकडून होत होते. मात्र, मंगळवारी परिसरातील बहुसंख्य वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे दिसून आले. यातील अनेक वृक्ष २५ ते ३० वर्षांपूर्वी लावण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी आणि संस्थेतील विविध उपक्रमांतून जतन केलेल्या या वृक्षांची अचानक तोड करण्यात आल्याने परिसराचे सौंदर्य गेले आहे.
विशेष म्हणजे, वृक्षतोडीनंतर ती झाडे रातोरात परिसरातून हलविण्यात आल्याचेही समोर आले आहे. शहरातील वृक्षतोडीसाठी नगरपालिकेची परवानगी आवश्यक असताना, या प्रकरणात महाविद्यालयाने नगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. वन विभागाची परवानगीही घेतल्याचे समोर आले नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड नेमकी कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या आदेशाने करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. या वृक्षतोडीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास मंजुळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.










