आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी पुन्हा एकदा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठा समाजाचे संघटन करण्यास सुरुवात केली आहे. १ डिसेंबर रोजी जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथून तुळजापूर आणि पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाणार आहेत. या दौऱ्यात जरांगे पाटील हे धाराशिववरून जाणार आहेत. धाराशिवच्या सकल मराठा समाजातर्फे धाराशिव शहरात जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांनी वेळ दिला तर शहरात ही बैठक होऊ शकते.मनोज जरांगे आरक्षणासंबंधी कोणती भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले सत्तास्थापनेच्या हालचाली वेगवान झालेल्या आहेत. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणल्याचे आरोप पूर्वी केलेले आहेत. तेच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्या संदर्भात काय निर्णय घेतात तसेच ते सकल मराठा समाजाला काय सूचना देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथून तुळजापूर कडे प्रस्थान करणार आहेत. तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन पुढे ते पंढरपूरकडे जाणार आहेत. या दरम्यान ते धाराशिव किंवा तुळजापूर शहरात एखादी बैठक घेऊ शकतात.