आरंभ मराठी | धाराशिव
धाराशिव शहरातील धारासुर मर्दिनी प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वैयक्तिक वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी शहर बंदचे आवाहन केल्याने या घटनेबाबत विविध अफवा पसरल्या आणि शहरात दंगल पेटल्याची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने अवघ्या पंधरा मिनिटांत घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे तसेच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खांडेकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शीघ्र कृती दलाच्या (QRT) तीन तुकड्याही तात्काळ तैनात करण्यात आल्या. मोठा पोलीस बंदोबस्त उभारून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात परिसरातील तणाव पूर्णपणे निवळला आणि परिस्थिती पूर्ववत झाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडला असून त्याचा कोणत्याही जातीय किंवा धार्मिक कारणाशी संबंध नाही. मात्र सोशल मीडियावर आणि अफवांमुळे शहरात दंगल झाल्याची चुकीची माहिती वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची भेट घेऊन धारासुर मर्दिनी प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी व त्या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावेत, अशी मागणी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, हा प्रकार केवळ वैयक्तिक वादातून घडला असून शहरात कोणतीही दंगल झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती खात्री करूनच पुढे पाठवावी आणि शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. या घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.










