आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील कौडगाव एमआयडीसी परिसरातील सोलर प्रकल्पाला रविवारी (दि.८) सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून, प्रकल्पातील तब्बल शंभर एकर क्षेत्र आगीच्या विळख्यात सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौडगाव एमआयडीसी परिसरात सुमारे साडेचारशे एकर जमिनीवर हा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रकल्पातील एका ठिकाणी अचानक आग लागली.
सुरुवातीला आगीचे प्रमाण कमी होते; मात्र काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. प्रकल्पातील सोलर पॅनल आणि संबंधित यंत्रणांच्या परिसरात आग वेगाने पसरत गेल्याने मोठ्या क्षेत्राला तिचा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गेल्या दोन तासांपासून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीची व्याप्ती मोठी असल्याने ती पूर्णपणे विझविण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती आहे.
या आगीत सोलर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, नेमके किती क्षेत्रातील सोलर पॅनल, विद्युत यंत्रणा आणि अन्य साहित्य जळून खाक झाले, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. साडेचारशे एकरांवरील प्रकल्पापैकी सुमारे शंभर एकर क्षेत्राला आगीचा फटका बसला आहे.










