सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर;
शारदीय नवरात्र महोत्सवासाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. १७ व १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईत एकूण ५१० किलो खवा, पेढे व कलाकंदाचा संशयास्पद साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
या कारवाईत १७ ऑक्टोबर रोजी तीन भट्ट्यांची तपासणी करून आठ औपचारिक नमुने घेण्यात आले. यावेळी २३६ किलो खवा, २८ किलो कंदी पेढे, २८ किलो साधे पेढे आणि १३ किलो केशर पेढे असा एकूण ३०५ किलो साठा जप्त करण्यात आला.
१८ ऑक्टोबर रोजी पाच अन्न आस्थापनांची तपासणी करून आठ सर्वेक्षण नमुने घेण्यात आले. या तपासणीत पांढऱ्या व तपकिरी रंगाचा सुटा कलाकंद आणि पिवळ्या रंगाचे पेढे असा २१० किलो संशयास्पद साठा आढळला. हा साठा नष्ट करण्यात आला.
_
खव्याऐवजी बिगर-दुग्धजन्य घटकांचा वापर
तपासणीदरम्यान काही पेढे व कलाकंदामध्ये पाम तेल, वनस्पती तेल आणि इतर बिगर-दुग्धजन्य घटकांचा वापर केल्याचे आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली. काही पदार्थांवर उत्पादकाचे नाव, घटक व उत्पादनासंबंधी आवश्यक माहिती असलेले कायदेशीर लेबल नव्हते. खरेदी-विक्रीची अधिकृत बिलेही उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३८(४) नुसार संबंधित व्यावसायिकांच्या संमतीने संशयास्पद माल नष्ट करण्यात आला. विनानोंदणी व्यवसाय करणाऱ्या संबंधित व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, सहआयुक्त श्रीकांत करकाळे आणि सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी पल्लवी इंबडे, गणेश दत्तु, अजय गाढे आणि अंकुश नरवाडे यांच्या पथकाने कारवाई केली. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे आणि तुळजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.









