सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर ; श्री तुळजाभवानी मंदिर येथे भाविकांना दर्शनासाठी समान सुविधा मिळाव्यात यासाठी मंदिर संस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १८ जूनपासून धर्मदर्शन आणि स्पेशल देणगी दर्शन पासधारक भाविकांना एकाच रांगेतून दर्शन देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली असून या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी मुखदर्शन, धर्मदर्शन, २०० रुपयांचा दर्शन पास आणि ५०० रुपयांचा स्पेशल दर्शन पास अशा विविध माध्यमांतून दर्शनाची सुविधा उपलब्ध होती. मात्र देणगी दर्शन पासधारकांना स्वतंत्र मार्गाने प्रवेश दिला जात असल्याने धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत होती. दर्शन व्यवस्थेत दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने पुढे येत होत्या.
या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेत बदल करत स्पेशल देणगी दर्शन पासधारक आणि धर्मदर्शनासाठी आलेल्या भाविकांना एकाच मार्गाने दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. सकाळपासूनच भाविकांनी नव्या व्यवस्थेचा अनुभव घेतला असून दर्शन अधिक सुरळीत आणि विनाअडथळा होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
यापूर्वी देणगी दर्शन पासधारकांना नहाणीगृह मार्गे सिंहगाभाऱ्यात प्रवेश दिला जात होता.
त्यामुळे इतर रांगांमधील भाविकांना विलंब सहन करावा लागत होता. नव्या व्यवस्थेनुसार देणगी दर्शन पासधारकांना दर्शन मंडपाच्या तळमजल्यातून सिंहगाभाऱ्यात सोडले जात असून धर्मदर्शनाची रांगही त्याच मार्गाने पुढे जात आहे. परिणामी सर्व भाविकांना अधिक समान आणि सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली असून मंदिर संस्थानच्या या निर्णयाला भाविकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.








