ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत संताप
आरंभ मराठी / धाराशिव
राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिवमधील शिवसेना उबाठा गटाचे कट्टर शिवसैनिक सुरेश गवळी यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. यापुढे शिवसेना उबाठा गटातून एकही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा प्रतिनिधी फुटला तर धाराशिव शहरात भेटेल तिथे तोंडाला शेण फासणारा मी एकमेव असेन, सावध रहा,असा इशारावजा मजकूर त्यांनी पोस्ट केला आहे.
राज्यातील संभाव्य पक्षांतरांच्या चर्चेमुळे निर्माण झालेली नाराजी आणि निष्ठावान शिवसैनिकांमधील संताप या पोस्टमधून स्पष्टपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळात ठाकरे गटातील नेत्यांच्या भूमिकांवर आणि संभाव्य राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, अशा प्रतिक्रिया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
–
निष्ठावान कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली
गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
पक्षातील आणखी कोणताही लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी गमावण्याची वेळ येऊ नये, अशी भावना तळागाळातील शिवसैनिकांमध्ये असून सुरेश गवळी यांची पोस्ट त्याच भावनेचे प्रतीक मानली जात आहे.








