आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमात गंभीर दुर्लक्ष केल्याप्रकरणी नळदुर्ग येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पी. डी. टेकाळे यांच्याविरोधात प्रशासकीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित विभागास निलंबनाची कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तुळजापूर यांच्या पत्रानुसार पी. डी. टेकाळे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर, नळदुर्ग यांची मतदान केंद्र क्रमांक ३५२ नळदुर्गसाठी BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये BLO ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, टेकाळे यांनी या संदर्भातील कोणतेही कामकाज केले नसल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी दिलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता निवडणुकीसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार तुळजापूर यांनी त्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना टेकाळे यांच्याविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.








