आरंभ मराठी / धाराशिव
मार्च महिना संपल्यानंतर दरवर्षी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला वेग येतो. विशेषतः शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होऊन पुढील तीन महिने सुरू राहते. मात्र, यंदा या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून, संपूर्ण देशभरातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहसचिव यांनी यासंदर्भातील स्पष्ट निर्देश दिले असून, देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे ‘जनगणना २०२७’ची मोठी पार्श्वभूमी असून, सध्या देशभरात जनगणनेची पूर्वतयारी युद्धपातळीवर सुरू आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे.
नागरिकांना ‘स्वयं-गणना’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात घरनोंदणी व घरांची गणना केली जाणार असून, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्य सरकार निश्चित करणार्या ३० दिवसांच्या कालावधीत हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.
सध्या राज्य, जिल्हा, तहसील तसेच प्रगणक गट स्तरावर जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही वेगाने सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात जनगणनेच्या कामासाठी सुमारे तीन हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रशिक्षण वर्गांनाही सुरुवात झाली आहे.
दरम्यान, २०२१ मध्ये होणारी जनगणना कोरोना महामारीसह विविध कारणांमुळे तब्बल सहा वर्षे लांबली आहे. त्यामुळे आता ‘जनगणना २०२७’ हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य ठरणार आहे. या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच केंद्र सरकारने बदली प्रक्रियेवर स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहसचिवांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, जनगणनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत करण्यात येऊ नये. राज्यांच्या मुख्य सचिवांनीही आपल्या स्तरावर याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबणार असल्याचे स्पष्ट झाले असून, संपूर्ण यंत्रणा जनगणना २०२७ यशस्वी करण्यासाठी सज्ज होत आहे.








